अमेठी हत्याकांडातील आरोपी चकमकीत जखमी
पोलिसांचे पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर गोळीबार
वृत्तसंस्था/अमेठी
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात शिक्षक, त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची गोळ्या झाडून हत्या करणारा मुख्य संशयित आरोपी चंदन वर्मा या चकमकीत जखमी झाला आहे. संशयित आरोपीने पोलिसाचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर चकमक झडल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चंदन वर्मा याच्या पायाला गोळी लागली.
चौकशीदरम्यान चंदन वर्माला घटनास्थळी नेले जात असताना पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. मोहनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. उत्तर प्रदेश एसटीएफने शुक्रवारी मारेकरी चंदन वर्माला नोएडा जेवार टोल प्लाझा येथून अटक केली होती.
अमेठीच्या शिवरतनगंज पोलीस स्थानक हद्दीतील अहोर्व भवानी चौकात भाड्याच्या घरात राहणारे शिक्षक सुनील कुमार (35), त्यांची पत्नी पूनम (32), मुलगी दृष्टी (6) आणि एक वर्षाची मुलगी सुनी यांची गुऊवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्यामुळे या हत्याकांडावरून सध्या उत्तर प्रदेशात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.