Kolhapur : कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून अत्याचार प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी आरोपी चेतन प्रदीप नरवाळे (वय ३५ रा. कामगार चाळ, संभाजीनगर) याला २० वर्षाच्यासक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. २५ सप्टेंबर २०२१ पूर्वी ही घटना घडली होती.
या खटल्याची हकीकत अशी, संबंधित पीडिता ही आरोपी चेतन नरवाळे याच्या घरात येत जात होती. नरवाळे याची पत्नी अंकिता ही पीडितेला भांडी घासण्याचे काम सांगत होती.दरम्यान, पत्नी अंकिता घरात नसताना चेतन याने पीडितेशी सात ते आठ वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच एके दिवशी आरोपीचा मित्र आदित्य घाबरे याने कामगार चाळीतील हॉलजवळ जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यामुळे पीडिता गर्भवती राहिली होती.
काही दिवसांनी घरातच पीडिता प्रसूत होऊन तिने मृत मुलीला जन्म दिला. यामुळे पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने चेतन नरबाळे याने आपल्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याचे सांगितले. कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले. यामुळे पिडितेच्या आईने नरबाळे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोक्सोची फिर्याद दिली होती. तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करुन नरबाळे याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले.
यावेळी सहायक सरकारी वकील शीतल रोटे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. फिर्यादी, तिची जाऊ आणि पुतणी यांच्यासह १२ साक्षीदार तपासले. अॅड. रोटे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती अग्रवाल यांनी आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याला २० वर्षाची सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी स्वाती कंदले, विशाल तळेकर, जनार्दन खाडे यांनी मदत केली.