For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक

12:38 PM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक
Advertisement

वार्ताहर/रामनगर

Advertisement

नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी पाटील (वय 50) या महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाटनजीक ब्रिजखाली  रॉडच्या साहाय्याने बांधून त्यावर दगड ठेवून पाण्यात टाकण्यात आला होता. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकाने सदर मृतदेह पाहून रामनगर पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रामनगर सरकारी हॉस्पिटलला हलविला. शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.

याप्रकरणी रामनगर पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ निघाली होती. सदर शिक्षिकेच्या खूनप्रकरणी नंदगड गावातीलच शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार शंकर पाटील याने सोन्यासाठी सदर अंगणवाडी शिक्षिकेचा खून नंदगड गावाजवळच करून तिचा मृतदेह आपल्याच वाहनातून तिनईघाट येथे नेऊन टाकल्याची कबुली दिली. तसेच तिच्याजवळील सोने हिसकावून खानापूर येथील खासगी बँकेत ठेवून रक्कम घेतल्याचे यावेळी त्याने सांगितले.

Advertisement

संशयित आरोपीने अश्विनी पाटील यांच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी तिच्याच मोबाईलवरून प्रथम आपण बेंगळूरला गेले असून सोमवारी येते असा संदेश पाठविला होता. त्यानंतर पुन्हा रविवारी पहाटे आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवून मृत महिलेचा मोबाईल तेथेच टाकून फरार झाला होता. शंकर पाटील व अंगणवाडी शिक्षिका यांची अनेक दिवसांपासून मैत्री असल्यामुळे ते दोघेही एकत्र यात्रेसाठी कक्केरी येथे गेले होते. सदर खून हा सोने मिळविण्यासाठी की इतर कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. खून करून मृतदेह लपविण्यासाठी वापरलेले वाहनही रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जोयडा तालुका मृतदेह फेकण्यासाठी सुरक्षित?

यापूर्वीही खून करून जोयडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मृतदेह टाकल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. गोवा राज्यातील अनेक मृतदेह कॅसलरॉक व आसपासच्या भागात फेकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हल्लीच चिकोडी येथे जागेच्या व्यवहारातून खून करून मृतदेह जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथे टाकण्यात आला होता. तर काही वर्षांपूर्वी पुणे येथील परिचारिकेचा खून करून मृतदेह गोवा-बेळगाव महामार्गावरील ऑस्ट्रेलिया ब्रिज येथे फेकण्यात आला होता. यातील काहींची ओळख तातडीने पटली होती. परंतु अनेक मृतदेहांची ओळख पटणेही मुश्कील झाले हेते. रामनगर येथील महिलेचा सोन्यासाठी खून करून मृतदेह कॅसलरॉक येथील जंगलात टाकण्यात आला होता. गोवा राज्यातील अनेक महिलांचे व मुलींचे मृतदेह, सांगाडे अनमोड घाटात यापूर्वी आढळले आहेत. त्यामुळे परराज्य, तसेच जिल्ह्यात खून करून जोयडा तालुक्यात मृतदेह टाकणे आरोपींना आता सुलभ वाटू लागले आहे.

Advertisement
Tags :

.