नकली सोन्याची नाणी देऊन दहा लाखांचा गंडा घातलेल्या आरोपीला अटक
कारवार : खरे सोने भासवून नकली एक किलो सोन्याची नाणी देऊन दहा लाख रुपयांचा गंडा घातलेल्या आंतरजिल्हा भामट्याला ताब्यात घेण्यात सिद्धापूर पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या भामट्याचे नाव गजेंद्र हालेशप्पा कोरचर (वय 34, रा. मुद्देशनहळ्ळी, ता. शिकारीपूर, जिल्हा शिमोगा) असे आहे. आरोपीकडून दहा लाख रुपये रोख रक्कम, बजाज डिस्कव्हरी मोटारसायकल आणि एक किपॅड मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी गजेंद्र याने सिद्धापूर तालुक्यातील एका व्यक्तीला गाठले आणि त्याने एक किलो वजनाची सोन्याची नकली नाणी त्या व्यक्तीला दिली आणि नाण्याच्या बदल्यात दहा लाख रुपये त्या व्यक्तीकडून घेतले. त्यानंतर आरोपी गजेंद्र फरारी झाला. आपणाला नकली सोन्याची नाणी देण्यात आल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने सिद्धापूर पोलीस ठाणे गाठले आणि त्या भामट्याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली. या फसवणूक प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितानुसार गजेंद्रच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई कारवार जिल्हा पोलीस प्रमुख दीपन एम. एस., अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णमूर्ती, शिरसीच्या डीवायएसपी गीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिद्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी. बी. सीताराम आणि उपनिरीक्षक शांतीनाथ के. पासाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत रमेश कोडल, चेतनकुमार, संतोष तळवार, मोहन गावडी, प्रशांत मणीकंठ, रोहित, गिरीश हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईबद्दल सिद्धापूर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.