For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हवामानाचा अचूक अंदाज समजणार

06:27 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
हवामानाचा अचूक अंदाज समजणार
Advertisement

                         

Advertisement

पृथ्वी आणि महासागराच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याच्या आपल्या मोहिमेवर पुढे जात इस्रोने शनिवारी हवामान निरीक्षण उपग्रह ‘इनसॅट-3डीएस’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. हा उपग्रह यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यानंतर हवामानाची अचूक माहिती समजण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तींबाबतही वेळेवर माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे बचाव आणि मदतकार्यालाही गती येईल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून या उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. जीएसएलव्ही-एफ 14 या अग्निबाणाची ही 14 वी मोहीम ठरली. हा उपग्रह तिसऱ्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘इनसॅट-3डीएस’ हा हवामानविषयक उपग्रह असून तो अवकाशात भूस्थिर कक्षेत प्रस्थापित झाला आहे. शनिवारी संध्याकाळी पूर्वनिर्धारित वेळेप्रमाणे 5 वाजून 35 मिनिटांनी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. 2013 मध्ये इनसॅट-3डीएस उपग्रहाच्या प्रथम आवृत्तीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. आता त्या उपग्रहाच्या सेवेत खंड पडू नये यासाठी हा नवा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे.

Advertisement

‘इनसॅट-3डीएस’ हा नवा उपग्रह भारत सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या अनेक विभागांसाठी साहाय्यभूत ठरणार आहे. पृथ्वी विज्ञान विभाग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय सागर तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय हवामान सर्वेक्षण संस्था आणि भारतीय सागर माहिती सेवा केंद्र इत्यादी संस्थांना या उपग्रहाने पाठवलेली माहिती उपयोगी ठरणार आहे. विशेषत: पावसाचे अनुमान अधिक अचूकपणे नोंदविता येणार आहे.

या अत्याधुनिक उपग्रहाच्या निर्मितीसाठी भारतातील अनेक खासगी उद्योगांनीही त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपग्रहाचे अनेक जटील भाग या उद्योगांनी निर्माण केले आहेत. या उपग्रहातील अनेक महत्वाच्या ट्रान्स्पाँडर्सची निर्मिती विविध उद्योगांनी करुन दिली आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा सारा भार केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाने उचलला आहे. इस्रोचे हे या वर्षातील अशा प्रकारचे दुसरे अभियान आहे. 1 जानेवारीला एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत संस्थेने नूतन वर्षाचा प्रारंभ धडाकेदार पद्धतीने केला होता.

Advertisement
Tags :

.