For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

06:06 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
संचित  प्रारब्ध आणि क्रियमाण
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी माणसाने सद्गुरुना साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करावी. निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून आत्मज्ञान समजून घ्यावे. दृश्य जगाचा मोह पडू लागला की, माणसाला आत्मस्वरूपाचा विसर पडतो. मोहामुळे हा आपला तो परका असा फरक मनुष्य करत असतो म्हणून प्रत्येकवेळी माणसाने मनात एखादा विचार आला की, त्यावर कृती करण्याअगोदर विचार करावा आणि मगच कृती करावी म्हणजे ते विवेकबुद्धीला धरून होईल. आत्मज्ञान झाले की, साधकाला स्वत:मधील आणि इतर सर्वांच्यातील भगवंताचे अस्तित्व जाणवू लागते आणि त्यामुळे तो भेदाभेद करत नाही.

मी आत्मज्ञानप्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरुना विनम्रभावाने शरण जाईन आणि त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करीन असे जो ठरवतो तो कितीही पापी असला तरी ज्ञानरूपी नौकेच्या आधाराने तो पापरूपी सागरातून अनायासे तरुन जाईल, असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. येथे माणसांची हत्या करणाऱ्या वाल्या कोळ्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. नारदमुनींचा उपदेश त्याला प्राप्त झाल्यावर त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याने तपश्चर्या केली आणि त्याचे वाल्मिकी ऋषित रुपांतर झाले.

Advertisement

जरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि । तरी ह्या ज्ञाननौकेने पाप ते तरशील तू ।।36।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुना ह्या जीवनात तू पातकांचे आगर, भ्रमाचा सागर किंवा संशयाचा मोठा डोंगर जरी असलास, तरी या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे. समोर दिसणारे जग खरे आहे हा भ्रम नाहीसा होतो. त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ. कारण, या जगात याच्यासारखे महान दुसरे काही नाही.

आत्मज्ञानाने दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. पहिली म्हणजे ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्याची पूर्वीची सर्व पापे जळून नष्ट होतात आणि दुसरी म्हणजे हे विश्व खरे आहे हा त्याला झालेला भ्रम नाहीसा होतो. ह्यातील पूर्वीची पापे कशी नाहीशी होतात ह्याबद्दल सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, अर्जुना! ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात् करतो, त्याप्रमाणे परमात्मज्ञानस्वरूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो.

संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो । तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ।। 37 ।।

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या तीन शब्दांच्या व्याख्या अशा आहेत. पूर्वजन्मी केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार माणसाच्या खात्यावर पाप किंवा पुण्य जमा होते. त्याला संचित असे म्हणतात. जेव्हा त्याचे फळ मिळायची वेळ येते तेव्हा ते प्रारब्धाच्या रूपाने पुढे ठाकते. त्याप्रमाणे वाट्याला आलेल्या प्रसंगात मनुष्य जसे वागतो त्याला क्रियमाण असे म्हणतात. आता कर्मबंध जळून जातो म्हणजे नक्की काय होते ते समजून घेऊ. माणसाच्या पूर्वकर्मानुसार त्याचे प्रारब्ध तयार होते. ज्या पूर्वकर्माची भली, वाईट फळे भोगायचा काळ चालू जन्मात आलेला असतो त्यानुसार तो भोग भोगत असतो परंतु ज्या पूर्वकर्माचे म्हणजे संचिताचे फळ मिळायचा काळ ह्या जन्मात येणार नसतो त्या कर्माचे प्रारब्धभोग त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाच्या धगीत जळून नष्ट होतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.