माणसाच्या स्वभावानुसार बाप्पा त्याला कर्मे देतात
अध्याय तिसरा
सात्विक माणसाचा स्वभाव स्थिर असल्याने सर्व देव ही एकाच ईश्वराची रूपं आहेत ह्या व्यासमुनींच्या वचनावर त्याची श्रद्धा असते आणि त्याप्रमाणे तो बाप्पांची मनोभावे पूजा करत असतो. राजसी माणसांच्या इच्छा कधीच संपत नाहीत. तसेच त्यांचा स्वभाव चंचल असल्याने त्याची एका ठिकाणी श्रद्धा न जडता निरनिराळ्या ठिकाणी जडत असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की, बाप्पा सोडून अन्य दैवते आपली इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्याच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या दैवताची ते सकाम आराधना करत असतात. प्रत्यक्ष ती बाप्पांचीच भक्ती होते. ज्याप्रमाणे पृथ्वीवर पडणारे पावसाचे सर्व पाणी ओहोळ, नद्या, नाले ह्यांच्यामधून वहात वहात जाऊन शेवटी समुद्राला मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाची भक्ती केली तरी ती शेवटी बाप्पांची भक्ती असते. तर तामसी मनुष्य आपण करतोय तेच बरोबर असं समजून हट्टाने त्याला हव्या त्या दैवताची भक्ती करत असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे लोक त्यांच्या त्यांच्या पसंतीच्या दैवताची काही ना काही मिळवण्यासाठी उपासना करत असले तरी ते नकळत त्या दैवताच्या रूपात बाप्पांचीच भक्ती करत असल्याने बाप्पा त्यांच्या इच्छा त्यांच्या हिताच्या असतील तर पूर्ण करतात.
या संपूर्ण अध्यायात बाप्पा मनुष्याने काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करण्यापेक्षा मुक्ती मिळवण्यासाठी भक्ती का करावी यावर भाष्य करतायत. मनुष्य सोडून इतर योनी ह्या भोगयोनी असल्याने त्यामध्ये त्या प्राण्याची बुद्धी फारशी विकसित झाली नसल्याने चांगले काय वाईट काय हे ठरवू शकत नाही. तमोगुणाचा प्रभाव त्यांच्या स्वभावात असतो. पण माणूस आपण करत असलेले कर्म योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवू शकतो आणि त्यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणं हे केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येक माणसाने ही संधी सोडू नये. मुक्ती मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करावेत ही जी विचारसरणी आहे तिला ज्ञाननिष्ठा असं नाव आहे. प्रत्येकाने ज्ञाननिष्ठ व्हावे अशी बाप्पांची इच्छा आहे. आपण सर्व बाप्पांची लेकरे आहोत आणि बाप्पांना सारखीच प्रिय आहोत पण मनुष्य म्हंटला की, प्रत्येकाचा स्वभाव निराळा त्याला अनुरूप विचारसरणी निराळी असं जरी असलं तरी प्रत्येकात ईश्वरी अंश आहे आणि तो फुलवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशी बाप्पांची इच्छा आहे. त्यादृष्टीने समान धागा म्हणून निरपेक्षता आणि ईश्वरस्मरण या दोन गोष्टींचा ते आवर्जून उल्लेख करतात. ह्या दोन गोष्टी पाळून जो वाट्याला आलेलं कर्म करत जाईल त्याचा उध्दार ते नक्की करतात. त्याला त्याच्या हृदयात स्थान देतात. पुढे बाप्पा सांगतायत की, मनुष्याच्या स्वभावानुसार त्याला कर्मे नेमून देण्याच्या उद्देशाने मी चार वर्णांची निर्मिती केली.
चत्वारो हि मया वर्णा रज सत्त्वतमों शत ।
कर्मांशतश्च संसृष्टा मृत्युलोके मयानघ ।। 18 ।।
अर्थ- हे पापरहिता, सत्व, रज व तम यांच्या अंशाने व कर्माच्या अंशाप्रमाणे या मृत्युलोकी चार वर्ण मी निर्माण केले.
विवरण-पूर्वप्रारब्धानुसार माणसाच्या स्वभावामध्ये सत्व, रज किंवा तम यापैकी एका गुणाचे प्राबल्य असते त्या गुणाला अनुरूप कर्मे त्याने केल्यास ते त्याला मानवते म्हणून बाप्पांनी चार वर्णांची निर्मिती केली यामागे जगरहाटी सुरळीत चालावी एव्हढा एकच उद्देश आहे. यामध्ये उच्चनीच असा भेदभाव त्यांच्या दृष्टीने तरी काही नाही. उलट नेमून दिलेले काम जो निरपेक्ष बुद्धीने त्यांच्या स्मरणात राहून करेल तो त्यांना प्रिय असतो.
क्रमश: