For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्याची इच्छा नसली तरी त्याच्या स्वभावानुसार त्याच्याकडून कर्मे घडतच असतात

06:12 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
मनुष्याची इच्छा नसली तरी त्याच्या स्वभावानुसार त्याच्याकडून कर्मे घडतच असतात
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

अर्जुनाने भगवंतांना विनंती केली की, माझी बुद्धी मला युद्ध करू नकोस असे सांगत आहे आणि तुम्ही युद्ध कर असे म्हणत आहात ह्यापैकी ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ हे मला कळत नाही ते मला समजावून सांगा. अर्जुनाच्या विनंतीला उत्तर देताना भगवंत म्हणाले, मोक्ष मिळवण्याचे ज्ञान आणि कर्म असे दोन मार्ग आहेत. या पैकी ज्ञानयोगाचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रुपता प्राप्त होते. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि त्यांनाही मोक्ष प्राप्त होतो. योगी त्याच्या तपस्येच्या जोरावर जलद गतीचा ज्ञानमार्ग निवडतो तर कर्मयोगी हळूहळू पुढे जातो. त्याला योग्यवेळी विहंगम मार्गाने मोक्षाची प्राप्ती होते. हे लक्षात न घेणाऱ्या कुणालाही असे वाटेल की, काहीही कर्म न करता ज्ञानमार्गाने जाऊन मोक्षप्राप्ती करून घ्यावी पण हे शक्य नाही असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणाले, वाट्याला आलेले कर्म न करण्याने माणसाला निष्कर्मता प्राप्त होत नाही, तसेच साक्षात्काररूप सिद्धीही मिळत नाही.

न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी । संन्यास्याच्या क्रियेने चि कोणी सिद्धि न मेळवी ।। 4 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कर्माचा आरंभ करून योग्य असे कर्म करण्यास सुरुवात न करता सिद्ध पुरुषांप्रमाणे नैष्कर्म्य नक्कीच साध्य होत नाही. ईश्वर ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार प्रत्येकाने कोणते कर्म करायचे ते ठरवत असतो. त्यामुळे वाट्याला आलेले कर्म टाकून द्यावे आणि निष्कर्म व्हावे, असे बोलणे व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. आधी कर्म करून मगच संन्यासी होता येते. जोपर्यंत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म केले पाहिजे असे समज. म्हणून ज्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी अशी तीव्र इच्छा आहे, त्याने त्याला मिळालेल्या कर्माचा त्याग करणे योग्य होणार नाही.

लोक आपल्या वाट्याला आलेले कर्म आवडेनासे झाले की, मी आता संन्यास घेतो असे म्हणून कर्म करायचे टाळतात. त्याप्रमाणे तू करत आहेस परंतु तू क्षत्रिय आहेस तेव्हा दुर्जनांना शासन करून सज्जनांना संरक्षण देणे हे तुझ्या वाट्याला आलेले कर्म आहे पण ते करायचे टाळून तू संन्यास घेतो असे म्हणत आहेस ही पळवाट झाली. आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो, असे होत नाही.

एखादे नावडीचे कर्म मी करणार नाही असे मनुष्य म्हणाला तरी ते सोडून इतर कर्मे तो करत असतोच की. मी कर्म करणार नाही असे मनुष्य ठरवूच शकत नाही. तरीही त्याने जरी असे मनात आणले तरी तो कर्म न करता क्षणभरदेखील राहू शकत नाही कारण प्रत्येकजण सत्व, रज आणि तम ह्या प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करून घेतच असतात. पुढील श्लोकात भगवंत म्हणले,

कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि । प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ।। 5 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी कर्म करतो किंवा त्याचा त्याग करतो असे म्हणणे चुकीचे आहे कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे सात्विक, राजस, तामस ह्या मायेच्या किंवा प्रकृतीच्या गुणांच्या अधीन असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.