मध्यप्रदेशात अपघात; 9 ठार, 24 जखमी
मृतांमधील एकजण महाराष्ट्रातील : डंपरला खासगी बसची धडक
वृत्तसंस्था/ सतना
मध्यप्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. मृतांपैकी 7 प्रवासी उत्तर प्रदेशातील तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
प्रयागराजहून नागपूरला जाणारी बस डंपरला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मैहर, सतना आणि अमरपाटण येथील जिल्हा ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग 30 वरील नादन देहात परिसरात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. रात्री 11.30 च्या सुमारास आभा ट्रॅव्हल्सची स्लीपर बस प्रयागराजहून नागपूरकडे जात होती. अपघातसमयी 53 आसनी बसमधून सुमारे 45 जण प्रवास करत होते. रिवा-जबलपूर महामार्गावरील चौरसिया ढाब्याजवळ बस येताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. बसची डंपरला टक्कर बसताच प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर काही वेळातच मदतीला वेग आला. तत्पूर्वी घटनास्थळीच काही जणांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.