पिंगुळी - मोडकावड येथे कार उलटली
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात
कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडकावड येथे पिंगुळी- गुढीपूर येथून झारापच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी व्हॅगनार कार दोन ते तीन वेळा कोलांटी घेत महामार्गावरच उलटली. ही घटना मंगळवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. कारमध्ये चालका व्यक्तीरिक्त कुणीही नव्हते.कार चालकाला किरकोळ दुखापत झाली.महामार्गावरील खड्ड्यांमुळे कारला अचानक ब्रेक मारला आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.कारचालक आज सकाळी आपल्या ताब्यातील व्हॅगनार कार घेऊन महामार्गावरून झारापच्या दिशेने वेगात जात होता. पिंगुळी- मोडकावड येथे महामार्गावरील खड्डा चुकविताना कार चालकाने अचानक ब्रेक मारला . त्यामुळे कारने दोन ते तीन कोलांट्या घेत महामार्गावरच उलटली. कार चालकाला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटना घडताच तेथील गॅरेज व अन्य व्यावसायिकांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात नव्हती.दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. काँक्रिटची लहान खडी भरून खड्डे बुजविले जातात.परंतु वाहनाची नेहमीची मोठी वर्दळ आणि पावसामुळे खड्डे पुन्हा डोके वर काढतात. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे वाचविताना किंवा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने यावर्षी अनेक अपघात घडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन जणांचे बळी गेले. खड्डे बुजविण्यासाठी तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून केली जात आहे.