For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुंभमेळ्यावरून रत्नागिरीत परतताना अपघात; तिघांचा मृत्यू

03:44 PM Feb 02, 2025 IST | Radhika Patil
कुंभमेळ्यावरून रत्नागिरीत परतताना अपघात  तिघांचा मृत्यू
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला घराकडे परतताना झालेल्या भीषण अपघातात तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर तर आणखी तिघेजण किरकोळ जखमी झाले. या भीषण अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे भूतपूर्व सरचिटणीस तथा निवृत्त प्राचार्य प्रताप सावंतदेसाई, इनोव्हा कार चालक भगवान झगडे व अथर्व निकम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या भीषण अपघाताच्या वृत्ताने संपूर्ण रत्नागिरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मलढोण शिवार समृध्दी महामार्गावर चॅनल नंबर ५४५ वावे पोलीस स्थानकाच्या हद्दीत शनिवारी पहाटेच्या सुमारास ४ वाजता घडला. कुंभमेळा आटपून घरी रत्नागिरीकडे येत असताना नाशिकमधील मार्गावरसिन्नर येथे समोरून येणाऱ्या डंपरने प्रताप सावंतदेसाई, भगवान झगडे हे प्रवास करत असलेल्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कार गाडीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

Advertisement

  • सावंतदेसाई, झगडे, निकम यांचा मृत्यू चटका लावणारा

या अपघातातील मृत प्रताप सावंतदेसाई (७३) यांची येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रणी भूमिका
राहत असे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे येथील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशीही सलोख्याचे संबंध होते. सदैव परोपकारी वृत्ती व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गरीब, गरजूंच्या कामांना ते प्राधान्य देत असत. नुकतेच रत्नागिरीत अखिल मराठा संमेलन पार पडले होते. या संमेलनाला त्यांनी १ लाखांची आर्थिक मदतही केली होती. तसेच नुकताच रत्नागिरीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी आग्रहावरून येथील अनेक मित्रमंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. सावंतदेसाई यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तर इनोव्हा कार चालक भगवान झगडे हे एक उत्तम वाहनचालक म्हणून रत्नागिरीत परिचित होते. येथील अनेकजण त्यांना आवर्जून दूर अंतरांच्या प्रवासासाठी वाहनचालक म्हणून नेत असत. अनेकजणांना दूर अंतरातील प्रवास त्यांनी घडवला होता. तर अथर्व निकम या हॉटेल व्यावसायिक असलेल्या उमद्या तरुणावरही काळाने अपघातात घाला घातला. त्यामुळे या तिघांचा झालेला दुर्दैवी मृत्यू साऱ्यांच्या मनाला चटका लावून गेला.

Advertisement
Tags :

.