अपघातग्रस्त विद्यार्थ्याने खाटीवरुन लिहिला पेपर
गोवा शालांत मंडळ, विद्यालयाचा स्तुत्य निर्णय
कुठ्ठाळी : सध्या सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षेत अपघातामुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कोलवाळ येथील श्रीराम विद्यामंदिराने एक स्तुत्य आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. अपघातामुळे हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या आणि बाकावर बसणे कठीण असलेल्या परीक्षार्थी मुलासाठी शाळेने चक्क बेडवर (खाटीवर) बसून पेपर लिहिण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे बाकावर बसून तीन तास पेपर लिहिणे अशक्य आहे.
विद्यार्थ्याची ही अडचण लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेतला आणि परीक्षा केंद्रावरच त्याच्यासाठी आरामदायी बेडची व्यवस्था केली. या सुविधेमुळे शारीरिक वेदना होत असूनही या विद्यार्थ्याने काल शुक्रवारी आपला पहिला पेपर आत्मविश्वासाने पूर्ण केला. शाळेच्या या संवेदनशील निर्णयामुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रातून श्रीराम विद्यामंदिर व्यवस्थापनाचे विशेष कौतुक होत आहे. श्रीराम विद्यामंदिर, गोवा शालांत मंडळ, शिक्षक व पालकांच्या सामंजस्यामुळे एका अपघातग्रस्त विद्यार्थ्याला दहावीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचे पेपर खाटीवरुन सोडविणे शक्य झाले.
‘विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होता कामा नये. विद्यार्थ्याचे एक वर्ष वाया जाता कामा नये, हाच आमचा उद्देश आणि भावना आहे.
- भगीरथ शेट्यो, अध्यक्ष, गोवा शालांत मंडळ
‘विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होता कामा नये. विद्यार्थ्याचे एक वर्ष वाया जाता कामा नये, हाच आमचा उद्देश आणि भावना आहे.