Sangali News: बस अपघातात 25 प्रवाशी जखमी
चालकाच्या हलगर्जीपणाने बस झाडावर आदळली
इस्लामपूर: इस्लामपूर-शिवपूरी रस्त्यावर इस्लामपूर-कोडोली एसटी बसला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घसरुन झाडावर आदळून झालेल्या अपघातात 20 ते 25 प्रवाशी जखमी झाले. बस भरधाव वेगात असताना चालक पाणी पित होता. ताबा सुटून बस बाजूच्या चरीत जाऊन झाडावर आदळली. हा अपघात सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राजमुद्रा होस्टेल समोर झाला.
अपघातातील जखमींची नावे अशी, हर्षवर्धन सुरेश कांबळे (31), रोहिणी हर्षवर्धन कांबळे (24, दोघे रा. अंबप, ता.हातकणंगले), लकव्वा बसाप्पा पुजारी (50, रा.लाडेगाव), बबन शंकर खांबे (70, रा.जक्राईवाडी), अंजली गणपती जाधव (70, रा.शिगाव), दस्तगिर गुलाब तांबोळी (78), अधिकराव रामचंद्र जगदाळे (55, चिकुर्डे), प्रियांका शशिकांत कांबळे (33, रा.अमृतनगर), असमा समीर शेख (30, रा.इस्लामपूर), जोया समीर शेख (14, रा.इस्लामपूर), उत्कर्षा किरण पाटील यांच्यासह अन्य जखमींचा समावेश आहे.
घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, इस्लामपूर आगाराची बस (क्रमांक एम एच 07 सी 9185) इस्लामपूरहून शिवपूरी, लाडेगाव, चिकुर्डेमार्गे कोडोलीला निघालेली होती. या बसचे चालक हणमंत यशवंत घोरपडे तर वाहक इम्रान म्हमूलाल पटेल होते. ही बस एन. डी. पाटील कारखान्यासमोरुन पुढे गेली. अरंद रस्ता व समोरुन येणाऱ्या वाहनांमुळे चालक घोरपडे यांचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस रस्त्याच्या बाजूच्या झाडावर जावून जोरात आदळली.
या बसमध्ये पुऊष व म]िहला प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थी होते. बस वाहकाच्या बाजूस झाडावर जावून आदळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही प्रवेशद्वार झाडात अडकल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यात अडचणी आल्या. प्रवाशांना चालक केबीन व मागील आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. एक-दोन प्रवाशी गंभीर जखमी आहेत. तर अन्य किरकोळ जखमी झाले. या अपघाता दरम्यान प्रवाशांचा भितीने आरडाओरडा सुऊ होता.
अन्य वाहनधारकांनी थांबून मदतकार्य राबवले. दरम्यान इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांचे सहकारी दाखल झाले. इस्लामपूर आगाराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तातडीने वेगवेगळया रुग्णवाहिका बोलावून जखमी प्रवाशांना उपचारासाठी हलवले. 10 प्रवाशी येथील उपजिल्हा रुग्णालयात तर अन्य प्रवाशी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान अपघातात बसचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध रेणुका तुषार नलवडे (24, रा. वाढे, ता. सातारा) यांनी वर्दी दिली आहे. त्या पती तुषार यांच्यासह प्रवास करीत होत्या. इस्लामपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
बस चालक घोरपडे हे अपघात झाल्यानंतर जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी मदत करण्याऐवजी बस सोडून पळून गेले. काही वेळांनी ते परतले. अपघाताची परिस्थिती कथन करु लागले. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.