आमणापूर मार्गावरील गतीरोधकामुळे अपघात
पलूस :
पलूस-आमणापूर मार्गावर असणारा स्पीडब्रेकर अपघाताचे केंद्र बनला आहे. संबंधित विभागाने हा स्पीड ब्रेकर काढावा, किंवा त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत, अशी मागणी पलूस गोंदीलवाडी येथील नागरीकांनी केली आहे.
पलूस-आमणापूर मार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. औंदुबर आमणापूर, मिलवडी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी या मार्गाचा नियमित वापर होतो. रात्री-अपरात्री या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांना स्पीडब्रेकर दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात. लहान मुले, महिला अनेकदा जखमी झाल्या आहेत.
याबाबत वारंवार सूचना करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सध्या उन्हाळा आहे, थोड्यच दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यावेळी मोठा अपघात घडून जीवितहानी घडू शकते. याचा गांभियनि विचार प्रशासनाने करावा, येथील स्पिड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून घ्यावेत. मार्गावर शेती आहे. आजूबाजूस पुदाले, गोंदील, मोरे, सिसाळ, माळी यांची वस्ती देखील आहे. या स्पिड ब्रेकर जवळच गेल्या वर्षी अपघात होवून महिलेला जीव गमवाला लागला होता. मोठ्या वाहनाच्या प्रकाश झोत डोळ्यावर पडल्यानंतर मोटारसायकल स्वारांना स्पिड ब्रेकर दिसत नाही. त्यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटून तो रस्त्यावर पडून अपघात घडतो.
औंदुबरला पहाटे व रात्री जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना देखील जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करून प्रशासनाने सदरच्या स्पीडब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत, किंवा हा स्पिड ब्रेकर काढून टाकावा अशी मागणी येथील शेतकरी आणि नागरिकांतून वर्गातून होत आहे.