For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : अपघातातील मृतदेहांच्या मदतीसाठी तत्पर असणारा शाबाज!

01:48 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news   अपघातातील मृतदेहांच्या मदतीसाठी तत्पर असणारा शाबाज
Advertisement

फोन करताच नेसरीतील शाबाज हा टेम्पो घेवून घटनास्थळी दाखल होतो.

Advertisement

By : विनायक पाटील

नेसरी : रस्त्यावरील अपघातातील अथवा अन्य घटनेत एखाद्याचा जीव गेल्यावर वाहनांची प्रचंड गर्दी व माणसांची वर्दळ असतानाही मृतदेह अथवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला आपल्या वाहनातून घेवून जाण्यास पुढे कोणच सरसावत नसतात. अशावेळी कोणी जर थांबतो अथवा संपर्क साधताच घटनास्थळी दाखल होवून मृतदेह उचलतो आणि रुग्णालयात अथवा मृताच्या घरी आपल्या वाहनातून घेवून जातो.

Advertisement

नाव, जात, धर्म या सगळ्या गोष्टी भेदून माणुसकीचा खरा मसीहा म्हणजे नेसरीतील मुस्लिम कुटुंबातील २२ वर्षीय शाबाज नाईकवाडी. माणुसकी हरवत चालली आहे. असं आपण अनेकदा ऐकतो. पण कधी कधी अशा घटना घडतात जे आपल्याला पुन्हा एकदा माणुसकीवर विश्वास ठेवायला भाग पाडतात. रस्त्यावर अपघात होतो. रक्ताच्या थारोळ्यात एखादा जीव तडफडतो. तर एखादा जागीच ठार होतो.

शिवाय घडणाऱ्या आत्महत्या, नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अशा अनेक घटना समाजात घडत असताना अनेक जण फक्त बघ्याची भूमिका घेतात. कोणी मोबाईलने फोटो, व्हिडिओ काढतो तर कोणी पुढे गेल्यास आपल्यावर अंगलट येईल या भीतीने पुढे जात नाहीत. अशा प्रसंगी एक फोन करताच नेसरीतील शाबाज नाईकवाडी हा तरुण आपली टेम्पो घेवून घटनास्थळी दाखल होती.

स्वतः त्या मृतदेहाला उचलत गाडीत घालून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेवून जात त्या ठिकाणी उतरून ठेवण्यापर्यंत माणुसकीचे दर्शन घडवतो. रक्ताच्या थारोळ्यातील तो मृतदेह आपली गाडी अस्वच्छ करेल अशी भावनाही कधी त्यांनी आजपर्यंत व्यक्त केली नाही. स्वार्थी दुनियेत निस्वार्थपणे काम करणाऱ्या या शाबाजच्या धाडसाचे व माणुसकीचे कौतुक अशा घटनानंतर होत असते.

याआधी शाबाजचे वडील माजी सैनिक सिकंदर नाईकवाडी हे अशा घटना घडल्यानंतर फोन येताच त्या ठिकाणी जाऊन मृतदेह उचलून आपल्या गाडीतून नेण्याचे काम करत होते. सध्या वयोमानानुसार ते घरीच असतात. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाबाजनेही त्यांच्या या निस्वार्थ सेवेचे काम पुढे चालू ठेवले आहे. हे काम करत असताना मनात कोणतीच भीती अथवा विचार येत नसल्याचे शाबाजने 'तरुण भारत संवाद'शी बोलताना सांगितले.

नेसरीसह परिसरात अशा पडणाऱ्या घटनावेळी शाबाजला फोन येताच क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी वाहनासह धावून जाणाऱ्या मृतदेहांच्या या मसीहाने कोणाचा जीव वाचवला अथवा नाही, पण मृतदेहाचा मान राखला, त्याला एक शेवटचा सन्मान दिला, त्या क्षणी त्याच्या गाडीने फक्त मृतदेह नाही तर माणुसकीही वाहून नेल्याची भावना या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

गडहिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी नजीक पंथरा दिवसाच्या अंतरात दोन अपघात घडून सत्तेवाडी येथील कला शिंदे ही विद्यार्थिनी अपघातात जागीच ठार झाली होती. त्यावेळी मृतदेह शिप्पूर तर्फ नेसरी येथील अनिल पाटील यांनी आपल्या वाहनातून नेसरी ग्रामीण रुग्णालयात नेला होता. तर शनिवारी झालेल्या अपघातात हडलगे येथील प्रेम यमेटकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला होता.

रोहित गंडाळे हा युवक गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णवाहिकेस कॉल करूनही ती वेळेत न आल्याने क्षणाचाही विचार न करता नेसरीतील सतीश जोशी यांनी रक्ताने माखलेला असतानाही आपल्या वाहनातून नेसरी ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांचेही कौतुक आणि चर्चा या अपघातानंतर होत होती.

Advertisement
Tags :

.