For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

56 वर्षांपूर्वी दुर्घटना, 4 मृतदेह हाती

06:15 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
56 वर्षांपूर्वी दुर्घटना  4 मृतदेह हाती
Advertisement

1968 मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले वायुदलाचे विमान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

1968 मध्ये रोहतांग खिंडीनजीक झालेल्या एका विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे चार मृतदेह भारतीय सैन्याला मिळाले आहेत. ही दुर्घटना 56 वर्षांपूर्वी घडली होती. एका सैन्य मोहीम पथकाने बर्फाने आच्छादित पर्वतांमधून हे मृतदेह हस्तगत केले आहेत. हे अभियान ‘चंद्र भागा’नावाच्या एका मोठ्या ऑपरेशनचा हिस्सा होते. संबंधित दुर्घटना 7 फेब्रुवारी 1968 रोजी घडली होती.

Advertisement

चंदीगडहून 102 प्रवाशांसोबत झेपावलेले भारतीय वायुदलाचे एएन-12 विमान प्रतिकूल हवामानामुळे दुर्घटनाग्रस्त झाले होते. दशकांपपर्यंत विमानाचे अवशेष आणि पीडितांचे अवशेष हिमाच्छादित प्रदेशात शोधण्यात येत होते.

2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी इन्स्टीट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या गिर्यारोहकांनी विमानाचे अवशेष शोधले हेते. यानंतर सैन्य खासकरून डोगरा स्काउट्सने  अनेक अभियान राबविले. 2005, 2006, 2013 आणि 2019 मध्ये राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत डोगरा स्काउट्सचाच सहभाग सर्वाधिक होता. 2019 पर्यंत केवळ 5 च मृतदेह हस्तगत होऊ शकले होते.

तीन जवानांची पटली ओळख

यावेळी मिळालेल्या 4 मृतदेहांपैकी तीन मृतदेह चांगल्या स्थितीत आहेत. तर चौथ्या मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. तीन सैन्य जवानांची ओळख नजीकच मिळालेल्या ओळखपत्रांच्या आधारे पटविण्यात आली आहे. नारायण सिंह, मलखान सिंह, थॉमस चेरियन अशी या हुतात्मा जवानांची नावे आहेत.

चौथ्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. चंद्र भागा ऑपरेशनने सैन्य स्वत:च्या हुतात्मा जवानांच्या परिवारांचे सांत्वन करण्यासाठी किती दृढ आहे हे सिद्ध केले आहे असे उद्गार एका अधिकाऱ्याने काढले आहेत. अधिक उंचीवरील अभियानांमध्ये प्रावीण्य प्राप्त झालेल्या डोगरा स्काउट्सने या अभियानाचे नेतृत्व केले आहे.

हे मृतदेह सापडल्याने दशकांपासूनची काही कुटुंबीयांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. हे शोध अभियान 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे अभियान डोगरा स्काउट्स आणि तिरंगा माउंटेन रेस्क्यूच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने चालविण्यात आले.

Advertisement
Tags :

.