एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्या
महाराष्ट्रातील तरुणाई आज रस्त्यावर उतरली आहे, हा केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्न नाही. तो राज्यातील बेरोजगार तरुणांच्या मनात साचलेल्या अस्वस्थतेचा उद्रेक आहे. सरकारी नोकरीच्या संधी मर्यादित आहेत. उद्योगांबाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचा अभिमान आहेच; परंतु त्याच महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यातील तरुणाला आपल्या पात्रतेला साजेशी रोजगाराची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत लाखो तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे केवळ परीक्षा नसून सन्मानजनक भविष्यात जाण्याचा मार्ग आहे. एमपीएससीमधील गैरप्रकार फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाले, असा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. या आयोगाच्या कारभारावर संशयाची सावली गेली तीन दशके वेगवेगळ्या स्वरूपात दिसली आहे. 1997 मधील भरती गैरप्रकाराच्या प्रकरणात खोट्या जात प्रमाणपत्रांचा आणि गुणांमध्ये फेरफाराचा आरोप झाला होता. 1999च्या परीक्षांशी संबंधित प्रकरणाने तर पुढे मोठे रूप घेतले. तत्कालीन अध्यक्ष एस. डी. कर्णिक यांच्यासह अनेकांवर 399 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्याचा आरोप झाला; लाचखोरीच्या आरोपांवर अटक, आरोपपत्र आणि दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया झाली. हे प्रकरण आजही पूर्णपणे इतिहासजमा झालेले नाही. 2013मध्ये एमपीएससीच्या परीक्षेसाठी असलेला लाखो उमेदवारांचा डेटा नष्ट झाल्याचे प्रकरण समोर आले आणि परीक्षा पुढे ढकलावी लागली. 2017-18च्या काळात बनावट उमेदवारांच्या टोळ्यांनी एमपीएससी परीक्षांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला. काही प्रकरणांत बनावट ओळखपत्रे तयार करून मूळ उमेदवाराच्या जागी दुसऱ्याला परीक्षा देण्यासाठी बसवले जात असल्याचे तपासात समोर आले. 2018मध्ये या प्रश्नावर संतप्त झालेल्या एमपीएससी परीक्षार्थींनी पुण्याहून मुंबईपर्यंत पदयात्राही काढली होती. 2019मध्ये पुन्हा बनावट उमेदवारांची प्रकरणे पुढे आली. म्हणजेच हा आजचा अचानक निर्माण झालेला आजार नाही. सरकारे बदलली, मुख्यमंत्री बदलले, आयोगातील चेहरे बदलले; पण आजार कायम राहिला. म्हणूनच आजचा प्रश्न केवळ विद्यमान अध्यक्षांच्या कार्यकाळापुरता मर्यादित करून चालणार नाही. मात्र, इतिहास मोठा आहे म्हणून वर्तमानातील जबाबदारी कमी होत नाही, हेही. 2026 मधील औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाने या अस्वस्थतेला नवे टोक दिले. तपासात एमपीएससीच्या अधिकाऱ्यांपर्यंत संशय पोहोचला. 22 मार्चला झालेल्या परीक्षेतील 77 प्रश्न कथितरीत्या आधीच लीक झालेल्या प्रश्नांशी जुळल्याचे तपासात समोर आले आणि अखेर औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द केली. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनातील मतभेद, परीक्षेच्या पद्धतीवरील वेगवेगळ्या भूमिका आणि राजकीय नेत्यांचा प्रवेश यामुळे चित्र गुंतागुंतीचे झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या मनातील मूळ प्रश्न तसाच आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या संधीचे संरक्षण कोण करणार? ही भावना केवळ महाराष्ट्रापुरती नाही. देशभरात स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या बातम्या, परीक्षा रद्द होणे, निकाल रखडणे आणि भरती प्रक्रिया लांबणे याने व्यवस्थेविषयी अविश्वास वाढतोय. नव्या पिढीची आपली संधी कोणीतरी हिरावून घेत आहे, अशी भावना झाली तर त्याचा परिणाम लोकशाही संस्थांवरील विश्वासावर होतो. जंतर-मंतरवरील आंदोलनांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत अस्वस्थता दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बाब स्पष्टपणे सांगितली, एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार थेट हटवू शकत नाही. ही भूमिका घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे. संविधानाच्या कलम 317नुसार अध्यक्ष किंवा सदस्याला गैरवर्तनाच्या आधारावर हटविण्याची प्रक्रिया राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. त्याच वेळी, कलम 316नुसार राज्य आयोगाच्या सदस्याचा राजीनामा राज्यपालांना उद्देशून असतो. पण येथेच मुख्यमंत्र्यांसमोर एक वेगळा मार्ग खुला आहे. अधिकार नसणे आणि नैतिक नेतृत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुख्यमंत्री अध्यक्षांना बडतर्फ करू शकत नसतील, तर त्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आवाहन का करू नये? आजच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द वजनदार आहे. अध्यक्षांनी स्वत:हून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाणे हे संस्थेची प्रतिष्ठा वाचविण्याच्या दृष्टीने अधिक मोठे पाऊल ठरू शकते.
