उत्तर कर्नाटकाच्या विकासाला गती द्या
अशोक पुजारींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : उत्तर कर्नाटकाच्या विकासाला गती देऊन राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, अशी मागणी उत्तर कर्नाटक विकास मंचने केली आहे. मंचचे अध्यक्ष अशोक पुजारी यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार यांना पाठविण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. दक्षिण कर्नाटकाच्या तुलनेत उत्तर कर्नाटकाचा विकास झालेला नाही. अनेकदा मोर्चे, आंदोलने झाली तरी यापूर्वीच्या व विद्यमान सरकारने दखल घेतलेली नाही. 10 वर्षांपूर्वी 400 कोटी ऊपये खर्चातून बेळगावात सुवर्णसौध उभारण्यात आले आहे. वर्षभरात हिवाळी अधिवेशन वगळता अन्य कोणतेच मोठे कार्यक्रम येथे होत नाहीत. बेळगाव शहरातील सरकारी महत्त्वाच्या कार्यालयांचे सुवर्णसौध येथे कार्यालय व्हावे. सरकारचे मध्यावधी अधिवेशन, मंत्रिमंडळ बैठक, विविध समितींच्या सभा सुवर्णसौधमध्ये घेण्यात याव्यात. आमदारांच्या निवासासाठी आमदार भवन उभारण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.