झाडांसाठीही एसीसारखी व्यवस्था
चीनही ही पद्धत होतेय व्हायरल
जगभरातील अनेक देश सध्या भीषण उष्णता आणि वाढत्या तापमानाला सामोरे जात आहेत. तीव्र ऊन आणि उष्मालाटेचा प्रभाव केवळ माणसांवर नव्हे तर वृक्षरोपांवरही पडतो. अशास्थितीत चीनच्या अनेक शहरांनी झाडांना वाचविण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबिली आहे. ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. चीनच्या अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठमोठ्या झाडांवर स्प्रिंकलर लावले जात आहेत. ही प्रणाली निश्चित वेळी आपोआप चालू होत झाडांवर पाण्याचा शिडकावा करत आहे. यामुळे झाडांना थंडपणा प्राप्त होतो, मातीत ओलावा कायम राहतो आणि तीव्र ऊनाचा प्रभाव कमी होतो.
कशी काम करते ही सिस्टीम
झाडांच्या मूळांकडे किंवा आसपास पाइप आणि छोटेछोटे स्प्रिंकलर लावले जातात. तापमान अधिक वाढताच ही प्रणाली आपोआप चालू होते, यामुळे झाडांच्या पानांवर आणि फांद्यांवर सौम्य पाण्याचा मारा होत राहतो. ही प्रक्रिया काही मिनिटांपयंत चालते, ज्यामुळे झाड सुकण्यापासून वाचते आणि त्यांना पुरेसा ओलावा प्राप्त होत राहतो.
का पडली गरज
उन्हाळ्यात तापमान 40 अंशांवर गेल्यावर झाडांची पानं कोमेजू लागतात, सातत्याने उष्ण हवा, तीव्र ऊनामुळे माती लवकरच कोरडी होते. वेळीच पाणी न मिळाल्यास झाडांचा विकास थांबतो आणि अनेकदा ती सुकून जातात. या धोक्याला कमी करण्यासाठी चीनच्या अनेक शहरांमध्ये आधुनिक सिंचन आणि मिस्टिंग सिस्टीमचा वापर केला जात आहे.
याचे लाभ काय?
या पद्धतीमुळे झाडांना उष्णतेपासून दिलासा मिळतो, मातीत दीर्घकाळापर्यंत ओलावा कायम राहतो. झाडांची पाने हिरवीगार राहतात, शहरांचे तापमान काही प्रमाणात कमी करण्यास मदत मिळते. हवेची गुणवत्ता चांगली राहते, हिरवाई दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहते. झाड आरोग्यदायी राहिल्यास ऑक्सिजन अधिक प्रमाणात उत्सर्जित करतात आणि वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. यामुळे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळतो. याचमुळे चीनमध्ये याला केवळ झाडांची देखभाल नव्हे तर पर्यावरण संरक्षणाचे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.
जेव्हा उष्णता अधिक पडते आणि रस्त्याच्या कडेला हजारो वृक्ष आहेत, तेथे अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो असे तज्ञ सांगतात. परंतु याकरता पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक सिंचन व्यवस्था आवश्यक आहे, जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही. चीनचे हे पाऊल पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर किती आवश्यक आहे हे दर्शविते. झाड केवळ ऑक्सिजनच पुरवत नाहीत, तर शहरांचे तापमान नियंत्रित ठेवणे, प्रदूषण कमी करणे आणि लोकांना आरोग्यदायी वातावरण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, याचमुळे त्यांची देखभाल करणे केवळ सरकारचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी देखील आहे.