पश्चिम बंगालमध्ये बालिकेवर अत्याचार
वृत्तसंस्था/कोलकाता
कोलकता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच एका 10 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे लोकांच्या संतापात भर पडली असून या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ही घटना दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील जयनगर वस्तीत या बालिकेचा मृतदेह शनिवारी आढळून आला. ती काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी मोठा मोर्चा पोलिस स्थानकावर काढला आणि स्थानकाला आग लावली. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने बालिकेला जीव गमवाला लागला असा आरोप तिच्या मातापित्यांनी नंतर बोलताना केला आहे.
अनेक वाहनांना आग
संतप्त जमावाने नंतर मार्गांवरील अनेक वाहनांना आगी लावल्या. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक खासदार प्रतिमा मोंडल यांच्याशीही जमावाने धक्काबुक्की केली. त्याना ‘गोबॅक’ असे फलक दाखविण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदार अग्निमित्रा पॉल आणि माकपचे काही नेत्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यांची पोलिसांशी वादावादीही झाली.
महिलांना सुरक्षा नाही
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात महिलांना सुरक्षितता उरलेली नाही. गुंडांचा सुळसुळाट राज्यभर चालला असून पोलिस निष्क्रिय आहेत. ते गुंडांना संरक्षण देत आहेत. या समाजविरोधी शक्तींचे भरण पोषण राज्य सरकारकडून केले जाते. हेच गुंड निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसला साहाय्य करतात. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
मृतदेह सुरक्षित ठेवा
अत्याचार झालेल्या बलिकेचा मृतदेह सुरक्षित ठेवावा आणि त्याचे शवविच्छेदन नि:पक्षपातीपणाने स्वतंत्र रुग्णालयात करावे, अशी मागणी खासदार पॉल यांनी केली आहे. राज्यसरकारची सर्वच यंत्रणा पोखरलेली असल्याने विश्वासार्हता संपलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे देण्यात यावा, असेही प्रतिपादन त्यांनी केले. बालिकांवर अत्याचार होण्याच्या घटना ही आता दैनंदिन बाब झाली आहे, असाही आरोप त्यांनी केला. या घटनेच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये इतरही अनेक स्थानी लोक रस्त्यांवर उतरल्याचे वृत्त आहे.