अबु आझमीच्या मुलाचा कांदोळीत मोठा कारनामा
कांदोळीत स्थानिकांना दाखविला बंदुकीचा धाक
म्हापसा : औरंगजेबाचे गुणगान केल्याप्रकरणी अडचणीत आलेले समाजवादी पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार अबु आझमी यांचा मुलगा फरहान आझमी व त्याचे साथीदार आणि स्थानिक लोक यांच्यात सोमवारी रात्री कांदोळी येथील न्युटन सुपर मार्केट परिसरात राडा झाला. फरहान आझमी याने बंदूक दाखवून धमकी दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी फरहान याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फरहान आझमी ज्या कारने आला होता, त्या कारने साईड लाईट न दाखवताच वळण घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला, असे तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. साईड लाईट न दाखविल्यामुळे तेव्हाच अपघात होता होता टळला गेला. याबाबत संतापलेल्या स्थानिकांनी फरहान आझमी याला जाब विचारला. त्यातच फरहान आझमी याने आपल्याकडील बंदूक बाहेर काढली. त्यामुळे वाद चिघळला. दोन्ही गट हातघाईवर येणार इतक्यात पोलिस दाखल झाले.
दादागिरीची भाषा करणाऱ्या फरहान अबु आझमीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास स्थानिकांनी नकार दिला. त्यांने उर्मटगिरीची भाषा वापरली, गोमंतकीयांचा अपमान केला, असे स्थानिकांनी सांगितले. कळंगुट पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक परेश सिनारी व इतरांनी फरहान आझमी व त्याचे साथीदार आणि स्थानिक तऊणांना कळंगुट पोलिसस्थानकात आणून कारवाई सुरू केली. फरहान आझमी तसेच त्याचे साथीदार झियॉन फर्नांडिस, जोझफ फर्नांडिस, शाम यांच्याविरोधात शाब्दिक बाचाबाची करीत खुल्या जागेत भांडण उकरून काढणे तसेच परिसरातील शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहितेच्या 195 तसेच 35 कलमाखाली रितसर गुन्हे दाखल करण्यात आले.