मनपाच्या सेवेत सामावून घ्या
24 तास पाणी योजनेतील कर्मचाऱ्यांची मनपाकडे मागणी
बेळगाव : शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेत कार्यरत असलेल्या व्हॉल्व्हमन, पंप ऑपरेटर आणि कुली कर्मचाऱ्यांना एलअँडटी कंपनीकडून कामावरून कमी केले जात आहे. अचानक सेवेतून कमी केल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करून घेऊन सेवा सुरक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी महापौर व उपमहापौरांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्ही महानगरपालिकेत व्हॉल्व्हमन, पंप ऑपरेटर आणि कुली कर्मचारी म्हणून प्र्रामाणिक व निष्ठेने सेवा केली आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या आदेशावरून केयूआयडीएफसीच्या अंतर्गत 2007 पासून ते 2020 पर्यंत सेवा बजावली. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता पाणीपुरवठा केला आहे. त्यानंतर 2021 पासून केयूआयडीएफसीकडून मनपाकडे आपले हस्तांतर करण्यात आले. मात्र पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीवर सोपविण्यात आल्याने तेव्हापासून एलअँडटी कंपनीच्या अखत्यारीत कोणत्याही प्रकारची सेवा सुरक्षा नसताना काम केले आहे.
1 जूनपासून आवश्यकता नसल्याचे कामगारांना पत्र
मात्र सदर खासगी कंपनीकडून 1 जूनपासून आम्हाला तुमची आवश्यकता नाही, असे मौखिक आणि लेखी स्वरूपात कळविले जात आहे. आपल्यापैकी बहुतांश कर्मचारी वयोवृद्ध आहेत. अशा कठीण परिस्थितीत सेवेतून कमी केल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर आपण मानवी आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहावे, कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा देण्यासह महापालिकेच्या सेवेत सामील करून घ्यावे व सेवा कायम करण्याची संधी द्यावी, असे निवेदना म्हटले आहे. मनपा आयुक्त कार्तिक एम. उपलब्ध होऊ न शकल्याने महापौर व उपमहापौरांना निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी मल्लेश चौगुले, सुब्रह्मण्यम कांबळे, संदीप कोलकार, मंजू दोडवाड, सिद्राम तळवार यांच्यासह बहुतांश कर्मचारी उपस्थित होते.