Kolhapur News | कोल्हापूर ए. एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील फरार संचालक सांगलीत अटक
संतोष कुंभार एलसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर -ए. एस. ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स एलएलपीची उपकंपनी असलेल्या ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड प्रकरणातील फरार संचालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मंगळवार, दि. २४ रोजी सांगलीतून अटक केली. संतोष नंदकुमार कुंभार (वय ४१, रा. वत्तनगर, पलूस, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. सुमारे सव्वा तीन वर्षांपासून तो फरार होता. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परतावा, परदेश सहलीचे आमिष आणि विविध लाभांचे आश्वासन देत ए.एस. ट्रेडर्स व ट्रेडविंग सोल्युशन या कंपन्यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. परतावा बंद झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र तसेच पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून १६ आरोपी फरार होते. त्यापैकी संचालक संतोष कुंभार हा ३ वर्ष २ महिने २७दिवसांपासून बेपत्ता होता. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना कुंभार हा पलूस येथील घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पचकाने सापळा रचत त्याला अटक केली. ही कारवाई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अनिल जाधव तसेच अंमलदार युवराज पाटील, अमित सर्जे, राजू येडगे व संजय हुंबे यांनी पार पाडली.
तपासावर एसपींचे बारकाईने लक्ष
एस.एस. ट्रेडर्ससह संबंधित इतर कंपन्यांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता स्वतः पाहत आहेत. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी एलसीबीचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. वर आठवडधाला तपासाचा आढावा घेतला जात आहे.
अद्याप १५ जण फरार
ए.एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील १५ संशयित अद्यापही फरारी असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.