ए. एस. ट्रेडर्सप्रकरणी फरार संचालिकेस अटक
दोन वर्षापासून होती फरार : एस ट्रेडर्समध्ये १८ वी अटक
कोल्हापूर
गुंतवणूकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या फरार संचालिकेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. सुधा सुधाकर खडके (वय ६२ रा. गुणे गल्ली, गडहिंग्लज) असे अटक केलेल्या संचालिकेचे नांव आहे. गोवा येथील तळेगाव दुर्गावाडी येथून खडकेला अटक करण्यात आले. ती २ वर्षे ३ महिने २६ दिवस फरार होती.
गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने कोल्हापुरातील ए. एस. ट्रेडर्सने गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. कंपनीचा मुख्य लोहतसिंग सुभेदासह ३० जणांवर या प्रकरणी २०२२ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक पसार झाले होते. आत्तापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर १३ कोटींच्या मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या असून, लवकरच त्यांची लिलाव प्रक्रिया होणार आहे. दरम्यान रविवारी या प्रकरणात आणखीन एक अटक करण्यात आली. तब्बल अडीच वर्षे फरार असणाऱ्या सुधा सुधाकर खडके या संचालिकेस गोवा येथून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. तिला न्यायालयात हजर केले असता, २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू येडगे, प्रविणा पाटील, विजय काळे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.