आंतरराष्ट्रीय कराटेत एबीपी स्पोर्टसच्या खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी
1 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्य पदकांची कमाई
कोल्हापूर
पेडाम (गोवा) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे स्पर्धेत वळीवडे (ता. करवीर) येथील अविनाश बाबासाहेब पाटील स्पोर्टस्च्या (एबीपीएस) कराटेपटूंनी कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्ण 1, रौप्य 4, कांस्य 3 पदके पटकावली. शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या चार राष्ट्रांचे संघ सहभागी झाले होते.
अविनाश बाबासाहेब पाटील स्पोर्टस् संघाने भारतातर्फे स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. या संघातील ओम विठ्ठल कोळीने वैयक्तिक काता प्रकारात बहारदार प्रात्याक्षिके सादर सुवर्ण पदक जिंकले. तसेच कुमिते या फाईट प्रकारातही ओम कोळी दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. याचबरोबर कुमिते प्रकारातच वर्धन सतिश खाडे, केदार तानाजी खांडेकर, श्रवण मल्हारी दुबळे यांनी प्रतिस्पर्धी कराटेपटूंवर वर्चस्व मिळवत अंतिम फेरीत धडक देऊन रौप्य पदकमिळवले. कुमिते प्रकारातच अंश सोमनाथ भोसले, धैर्यशील निवास माने व द्वारकेश दिग्विजय चव्हाण यांनी कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी कराटेपटूंना पराभूत करत पदकावर कब्जा केला. या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त कराटेपटूंची नेपाळ (काठमांडू) येथे 9 ते 10 मे या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. त्यांना एबीपीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील, मुख्य प्रशिक्षक रोहित काशीद यांचे मार्गदर्शन लाभत आहे.