Kolhapur Bandhara: 50 हून अधिक बंधाऱ्यावरुन धोकादायक प्रवास, इंद्रायणीनंतर आता जाग येईल का?
सात पूलांना सरासरी 60 ते 100 वर्ष झाल्याने त्यांचेही आयुष्यमान तपासण्याची गरज
By : संतोष पाटील
कोल्हापूर : पंचगंगा नदीवर 65 कोल्हापूर पद्धतीने बंधारे आहेत. ज्यांचा मूळ उद्देश फक्त पाणी अडवणे इतकाच आहे. या पूलांच्या बाजूला अनेक ठिकाणी पर्यायी पूलही झाले आहेत. पर्यायी व्यवस्था नसणाऱ्या बंधाऱ्यांवरुन वाहतूकच नव्हे तर अवजड वाहनेही ये-जा करतात.
शहराला जोडणाऱ्या सात पूलांना सरासरी 60 ते 100 वर्ष झाल्याने त्यांचेही आयुष्यमान तपासण्याची गरज आहे. कोकणातील ‘सावित्री’नंतर आता पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येईल काय? धोकादायक बंधाऱ्यांवरुन 100 टक्के वाहतूक बंद तसेच शहरातील पूलांच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, अशी किमान अपेक्षा आहे.
पंचगंगा नदीवर 65 कोल्हापूर पद्धतीने बंधारे आहेत. ज्यांचा मूळ उद्देश फक्त पाणी अडवणे इतकाच आहे. या पूलांच्या बाजूला अनेक ठिकाणी पर्यायी पूलही झाले आहेत. पर्यायी व्यवस्था नसणाऱ्या बंधाऱ्यांवरुन वाहतूकच नव्हे तर अवजड वाहनेही ये-जा करतात.
शहराला जोडणाऱ्या सात पूलांना सरासरी 60 ते 100 वर्ष झाल्याने त्यांचेही आयुष्यमान तपासण्याची गरज आहे. कोकणातील ‘सावित्री’नंतर आता पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येईल काय? धोकादायक बंधाऱ्यांवरुन 100 टक्के वाहतूक बंद तसेच शहरातील पूलांच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, अशी किमान अपेक्षा आहे.
शहराचे प्रवेशव्दार असलेल्या जयंती नाल्यावरील महत्वाच्या सात पुलांचे स्थापत्य शास्त्रानुसार आयुष्यमान संपले आहे. याशिवाय जगाला कोल्हापूरने दिलेली पाणी अडवण्याची सहज सोपी पद्धत म्हणून कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याची ओळख आहे. हा बंधारा सिंचन आणि पिण्यासाठी नदीतील अतिरिक्त पाणी अडवण्याची सोपी पद्धत म्हणून प्रचलित आला.
पंचगंगा नदीवर असे 65 बंधारे आहे. यातील 50 हून अधिक बंधारे सरासरी 80 वर्षापेक्षा जुने आहेत. या बंधाऱ्यांवरुन अवजड वाहतुकीस बंदी आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकारने खास निधी तसेच मोहीम राबवून बंधाऱ्याशेजारी नवीन पूल बांधले आहेत. मात्र तरीही जुन्या बंध्राऱ्यांवरुन वाहतूक सुरूच आहे.
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा यातील सर्वात पहिला आहे. या बंधाऱ्याशेजारील पर्यायी पूलाचे काम 8 वर्षापासून रखडले आहे. बंधाऱ्यावरुन इतर वाहतुकीसोबतच अवजड वाहने तसेच उसाचे किमान 20 टन ओझं असणारे ट्रॅक्टर-ट्रॉली ये-जा करत असतात. हीच स्थिती जिह्यातील अनेक बंधाऱ्यांची आहे.
शॉर्टकट म्हणून या बंधाऱ्यांचा वापर होत आहे. जीर्ण असलेल्या बंधाऱ्यांवरुन होणारी वाहतूक जीवघेणी ठरु शकते. मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. शहराच्या विस्ताराची व्दारे खुली करणाऱ्या जयंती नाल्यावरील महत्वाच्या सात पूलांना किमान 125 ते 150 वर्षे झाली आहेत. सावित्री नदीवरील अपघातानंतर 2018 च्या दरम्यान कोल्हापूर महापालिकेने मुंबईतील स्ट्रक्चरवेल कंपनीकडून या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते.
कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पूलांच्या सक्षमीकरणाची गरज व्यक्त केली. मात्र, यासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. आता पुण्यातील इंद्रायणी नदीचा जुना पूल कोसळून अनेकांचा जीव गेला. शहराला जोडणाऱ्या या सात पूलांचे सक्षमीकरण आणि बंधाऱ्यांवरील धोकादायक वाहतूक बंद करण्यासह नवीन पर्यायी व्यवस्थेची नितांत गरज आहे.
कसबा बावडा जयंती नाल्यावर 1876 साली पूलाची बांधणी झाली. लक्ष्मीपुरीतील संभाजी पूल 1870 मध्ये बांधला. रविवार पूल 1879 साली झाला. हुतात्मा पार्क येथील उत्तर आणि दक्षिण बाजूने दोन्ही पूल नव्याने 1953 साली बांधले. दसरा चौकातील शाहू पूल 1875 साली तर लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल 1892 साली बांधला.
शहर विस्तारात मैलाचा दगड ठरलेल्या या पूलांचे आयुष्यमान स्थापत्यशास्त्राच्या निकषानुसार संपलेले आहे. निर्माण काळात घोडागाडीची वाहतूक नजरेपुढे ठेवून त्यांची बांधणी झाली. मात्र, आजही जुन्या पायावर हजारो टन अवजड वाहनांची वाहतुकीचा भार हे पूल सोसत आहेत. ही अवस्था जिह्याभर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यांची आहे.
पूलांचे आयुष्यमान संपले
कोल्हापूर हे 1870 पर्यंत पेठा आणि वस्त्यांमध्ये विभागलेले खेडे होते. कसबा बावडा जयंती नाला पूल, संभाजी पूल, साठमारी रस्त्यावरील हुतात्मा पूल, उमा टॉकीज येथील रविवार पूल, आदी महत्वाच्या पुलांची बांधणी त्यावेळच्या जयंती नदीवर झाली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर पूर्व बाजूला विस्तार झाला. पश्चिमेला पंचगंगा असल्याने शहराच्या वाढीवर नैसर्गिक मर्यादा होत्या.
जयंती नाल्यावरील पूलांच्या बांधणीनंतर शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसर वसला. 1870 ते 1953 पर्यंत टप्प्याटप्प्याने या पूलांची बांधणी झाली. त्यानंतरच कोल्हापूरचा भौगोलिक विस्तार झाला. कोल्हापूर विस्तारावे, यासाठीच त्यांची नियोजनपूर्वक बांधणी करण्यात आली. शहरातील प्रवेशासाठी आजही एकमेव मार्ग म्हणून हे पूल दीडशे वर्षे सेवा देत आहेत.
पूलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा पाठपुरावा करू
"शहरातील सात पूलांच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाला यापूर्वीच सादर केला आहे. या पूलांचे सक्षमीकरण करण्याबाबत पुन्हा पाठपुरावा करु."
- हर्षजीत घाटगे, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका