लाँड्री व्यावसायिकांचा घनकचरा कर रद्द करा
बेळगाव लाँड्री ओनर्स असोसिएशनची महापौरांकडे मागणी
बेळगाव : मनपाकडून व्यापार परवाना देताना व नूतनीकरण करताना लाँड्री व्यावसायिकांकडून घनकचरा व्यवस्थापन कर आकारला जात आहे. मात्र लाँड्री व्यवसायाच्या माध्यमातून कचरा निर्माण होत नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा रजक समाज बेळगाव लाँड्री ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने महापौर मंगेश पवार यांना देण्यात आले. शहर व उपनगरात व्यापार आणि व्यवसाय करणाऱ्यांना मनपाकडून व्यापार परवाना दिला जातो. यापूर्वी घनकचरा प्रकल्पासाठी वेगळा कर आकारला जात होता. मात्र यावर्षीपासून व्यापार परवाना देतानाच संबंधितांकडून कर आकारला जात आहे. शहरातील काही लाँड्री व्यावसायिकांकडून व्यापार परवान्याच्या माध्यमातून महापालिकेने मोठ्या प्रमाणात घनकचरा कर आकारला आहे. त्यामुळे याचा फटका लाँड्री व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे घनकचरा कर आकारण्यात येऊ नये तसेच तो रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन यावेळी महापौरांना देण्यात आले.