एमआयडीसी रद्द करा...अन्यथा विधानसभेवर बहिष्कार
रिळ-उंडी ग्रामस्थां निर्धार :-ग्रामसभेत सर्वानुमते ठराव केला, लढाही उभारणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील रिळ-उंडी एमआयडीसी व्हावी अशी मागणी गावातील एकाही ग्रामस्थाने प्रशासनाकडे केलेली नाही. एमआयडीसी आल्यास गावाचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येईल, इथल्या पर्यावरणाचा ऱहास होईल. प्रदूषित कारखान्यांमुळे गावातील पारंपरिक व्यवसाय, उद्योगधंदे धोक्यात येतील. यामुळे रिळ-उंडी एमआयडीसी रद्द करण्याची अधिसूचना राज्य सरकारने तातडीने काढावी. अन्यथा येणाऱया विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा निर्णय रिळ-उंडी गावातील ग्रामस्थांनी घेत तसा सर्वानुमते ठरावही केला आहे.
रिळ-उंडी एमआयडीसीबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावत एमआयडीसी उभारण्यास कडाडून विरोध केला. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत एमआयडीसीच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱया सांडपाण्यामुळे गावातील पाण्याचे स्त्राsत प्रदूषित होतील असे कोणतेही उद्योग गावात सुरू करू नयेत अशी भूमिका घेण्यात आली होती. यानंतर प्रशासनाने जमीन मालकांना 32-2 च्या नोटिसा दिल्यानंतर हरकती नोंदवून न घेताच घाई गडबडीत जमीन मोजणीला सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे