अखेरच्या मिनिटाला अभिषेकचा मास्टरस्ट्रोक!
आशियाई क्रीडा स्पर्धा : पाकिस्तानला पराभूत करत भारतीय हॉकी संघ फायनलमध्ये : 4-3 गोलफरकाने निसटती मात
वृत्तसंस्था/नागोया
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवत पुरुष हॉकीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला. तब्बल 59 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता. मात्र, अखेरच्या 60 व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून हरमनप्रीतने 2, सुखजीत आणि अभिषेकने प्रत्येकी एक गोल केला. आता, अंतिम फेरीत भारतासमोर मलेशियाचे आव्हान असणार आहे.
आशियाई स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध लढतीतही शानदार कामगिरी साकारली. सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल करत टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात सुखजीत सिंगने आणखी एक गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी केली. यानंतर 30 व्या मिनिटाला अबू मोहम्मदने पाकिस्तानसाठी गोल केला. मध्यंतरापर्यंत भारत 3-1 अशा आघाडीवर होता.
तिसऱ्या सत्रात पाककडून हन्नान शहीदने गोल करत आघाडी 3-2 अशी कमी केली. याउलट टीम इंडियाला तिसऱ्या सत्रात एकही गोल करता आला नाही. चौथ्या सत्रात मात्र दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला. वहीद राणाने गोल करत पाकला 3-3 असे बरोबरीत नेले. सामना संपण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असताना दोन्ही संघांकडून निर्णायक गोलची प्रतीक्षा होती. मात्र, अखेरच्या क्षणी 60 व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी निर्णायक गोल केला. भारताने 4-3 अशी आघाडी घेतली आणि अखेर हीच आघाडी कायम ठेवत पाकिस्तानचा पराभव केला. पाकवरील या शानदार विजयासह भारताने पुरुष हॉकीमध्ये फायनल गाठली आहे.
कोरियाला पराभूत करत मलेशिया अंतिम फेरीत
पुरुषांच्या हॉकीमध्ये मलेशियाने दक्षिण कोरियाला 2-1 असे पराभूत केले आणि थाटात अंतिम फेरी गाठली आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात मलेशियन सुरेख खेळ साकारला. याउलट कोरियन संघाला या सामन्यात अपेक्षित कामगिरी साकारता आली नाही. मोक्याच्या क्षणी मलेशियन संघाने गोल करत फायनल गाठली आहे. आता, 3 ऑक्टोबर रोजी भारत आणि मलेशिया यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल.