For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिषेकचे धोंडव्रताचे स्वप्न राहिले अपुरे

02:57 PM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिषेकचे धोंडव्रताचे स्वप्न राहिले अपुरे
Advertisement

फीट येऊन नदीपात्रात पडल्याने मृत्यू : वाठादेव सर्वण येथील दुर्दैवी घटना

Advertisement

डिचोली : मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने देवी श्री लईराईच्या जत्रोत्सवात धोंडगण म्हणून सहभागी होऊन सेवा बजावण्यासाठी आतुर असलेल्या दामोदर उर्फ अभिषेक दळपत नाईक (वय 23 वर्षे) या काजीवाडा, कारापूर-साखळी येथील युवकाचे स्वप्न अधुरे राहिले. सोवळे व्रतात सहभागी होण्यासाठी कपडे भिजवून आंघोळ करतानाच अभिषेक याच्यावर काळाने झडप घातली. फीट येऊन तो गुडघाभर पाण्यात पडल्याने व तेंड पाण्याखाली गेल्याने श्वास बंद झाल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. वाठादेव सर्वण डिचोली येथे वाठादेव देवस्थानच्या मागील बाजूस असलेल्या नदीवर ही दुर्दैवी घटना काल गुरुवारी घडली. दामोदर उर्फ अभिषेक याला धोंडगण म्हणून रूजू होऊन अद्याप पाच वर्षे न झाल्याने तो पाच दिवसांचे सोवळे व्रत पाळत होता. काल दि. 16 एप्रिल रोजी अमावस्या असल्याने त्याच दिवशी पाच दिवसांचे सोवळे व्रत पाळणारे धोंडगण आपापल्या तळांवर रूजू होतात. त्याचप्रमाणे वाठादेव सर्वण येथील श्री वाठादेव मंदिराच्या आवारात तळ साकारून तेथे व्रत पाळणारे धोंडगण काल गुरुवारी सकाळपासून जमा झाले होते.

आंघोळ करतानाच आली फीट

Advertisement

दामोदर व त्यांचे वडीलही धोंडगण असल्याने या तळावर दाखल झाले होते. तळावर दाखल होताच सर्वप्रथम आपल्यासमवेत आणलेले सर्व साहित्य पाण्यात भिजवावे लागते. वाठादेव मंदिराच्या मागील भागात वाहणाऱ्या नदीचे पाणी या काळात खुपच कमी असते. गुडघाभर असलेल्या एका पाण्याच्या ठिकाणी अभिषेक याने आपले कपडे, बॅग भिजवल्यानंतर आंघोळ करत असतानाच त्याला फीट आली व तो पाण्यात पडला. याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.

पाय दिसताच सर्वांची धावपळ

सर्वजण आपापल्या कामात असतानाच नदीपात्रात कोणीतरी असल्याचे दृष्टीस पडले. प्रथमदर्शनी कोणीतरी असह्य उकाड्यामुळे पाण्यात डुंबून राहिल्याचा अंदाज काहींनी बांधला. परंतु काहीवेळाने पाय चप्पलासह पाण्याच्यावर तरंगत असल्याचे दृष्टीस पडताच सर्वांची धावपळ सुरू झाली. सर्वांनी नदीपात्राकडे धाव घेतली असता अभिषेक पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. अन्य सहकारी धोंडगणांनी त्याला पाण्याबाहेर काढले व त्याचे पोट दाबले असता त्याच्या तोंडातून फेस बाहेर आला. त्याच्या हाताची नाडी तपासली असता ती बंद झाल्याचे निदर्शनास आले. लागलीच 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अभिषेक मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात व नंतर उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉमध्ये नेण्यात आला.

अभिषेकला गेल्यावर्षीही आली होती फीट...

अभिषेक याला फीट येत होती. गेल्यावर्षी जत्रोत्सवात सहभागी झाला असता फीट आल्याने त्याला होमकुंड मार्गक्रमणासाठी पाठविण्यात आले नव्हते. तरीही नव्या उत्साहात यावर्षीही जत्रोत्सवात व सोवळे व्रतात सहभागी होण्यासाठी आपल्या तळावर आलेल्या अभिषेक याच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढावला. सोवळे व्रतात सहभागी होण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. व त्याचे जत्रोत्सवात सहभागी होऊन देवी लईराईची सेवा बजावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या घटनेमुळे वाठादेव येथील सर्व धोंडगण हळहळले. तसेच त्याच्या काजीवाडा, विठ्ठलापूर, साखळीतही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.