For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिषेक बॅनर्जी यांना धक्काबुक्की

06:22 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिषेक बॅनर्जी यांना धक्काबुक्की
Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नातेवाईक आणि तृणमूल काँग्रेसचे नेते लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना जमावाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. शनिवारी ते पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. सोनारपूर येथे ते आले असताना त्यांच्या विरोधात जमावाने उग्र निदर्शने केली. जमावातील काही जणांनी बॅनर्जी यांच्यावर अंडीफेक आणि दगडफेक केली. त्यांना काही जणांनी धक्काबुक्कीही केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या हल्ल्यासाठी भारतीय जनता पक्ष उत्तरदायी आहे, असा आरोपही करण्यात आला. मात्र भारतीय जनता पक्षाने हा आरोप नाकारला असून अभिषेक बॅनर्जी यांनी जमावाशी उद्धट वर्तन केले. त्यामुळे खवळलेल्या जमावाने त्यांना तेथून हाकलून लावले, असा प्रत्यारोप केला आहे.

बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या राज्यातील सत्ताधारी हिंसक बनले आहेत, असा आरोप त्यांनी केला. अभिषेक बॅनर्जी यांनीही या घटनेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षालाच जबाबदार धरले. या पक्षाने हेतुपुरस्सर जमाव जमवून आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तथापि, भारतीय जनता पक्षाने हा आरोप नाकारला असून जमाव आम्ही जमवलेला नाही. तृणमूल काँग्रेसची सत्ता असताना बॅनर्जी यांनी जी कृत्ये केली आहेत, त्यांच्या विरोधात लोकांमध्ये क्षोभ आहे. त्याचा परिणाम म्हणून ते जिथे जातील तिथे सामान्य नागरीक त्यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत, असा आरोप या पक्षाने केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.