For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडीसमोर हजर राहिले अभिषेक बॅनर्जी

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
ईडीसमोर हजर राहिले अभिषेक बॅनर्जी
Advertisement

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 6 हजार पानी जबाब

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे गुरुवारी ईडीसमोर हजर राहिले आहेत. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर अभिषेक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तपासात मी नेहमीच सहकार्य केले आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. तपास यंत्रणेने पुन्हा समन्स बजावल्यावर निश्चितच हजर राहणार असल्याचे अभिषेक यांनी सांगितले आहे. अभिषेक यांनी ईडीला 6 हजार पानांचा जबाब सोपविला आहे. तपास यंत्रणेने अभिषेक बॅनर्जी यांना बुधवारी समन्स पाठविला होता. यापूर्वी ईडीने 3 ऑक्टोबर रोजी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. परंतु त्यादिवशी अभिषेक हे ईडीसमोर हजर राहिले नव्हते. दिल्लीमध्ये 2-3 ऑक्टोबर रोजी तृणमूल काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

Advertisement

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने अभिषेक बॅनर्जी यांची 13 सप्टेंबर रोजी साडेनऊ तासांपर्यंत चौकशी केली होती. इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होण्यापासून रोखण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचा आरोप अभिषेक यांनी त्यावेळी केला होता. त्याचदिवशी दिल्लीत इंडिया आघाडीच्या समन्वय/व्यूहनीति समितीची पहिली बैठक आयोजित झाली होती. पार्थ चटर्जी हे राज्याचे शिक्षणमंत्री असताना शिक्षक भरती घोटाळा झाला आहे. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाकडे अनेक तक्रारी पोहोचल्या होत्या. कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीत आघाडीचे स्थान देण्यात आले तसेच गुणवत्ता यादीत नाव नसलेल्यांनाही नोकरी मिळाली होती. याचबरोबर टीईटी उत्तीर्ण न झालेल्या लोकांनीही नोकरी देण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

तृणमूल नेता तुरुंगात

सीबीआयने मागील वर्षी 30 सप्टेंबर रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांच्यासमेत 16 जणांची नावे सामील होती. ईडीने पार्थ चटर्जी आणि त्यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना अटक केली होती. पार्थ चटर्जी हे 23 जुलै 2022 पासून तुरुंगात आहेत.

Advertisement
Tags :

.