शिगावात उद्यापासून अभिनव प्रतिष्ठानची व्याख्यानमाला
बागणी :
शिगाव येथील अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानमाला सोमवार ३ मार्चपासून सुरू होत असून यामध्ये प्रसिद्ध व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. गेली अकरा वर्ष सातत्याने विचारांची पेरणी करण्याचे काम अभिनव प्रतिष्ठान करत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाहक प्राध्यापक प्रमोद चव्हाण यांनी दिली.
प्रमोद चव्हाण म्हणाले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य पी. बी. पाटील आहेत. सेवानिवृत्त डीवायएसपी शंकरराव जाधव हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. सर्व व्याख्याने सायंकाळी ७:३० वा. श्री. छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथे होणार आहेत.
प्रसिद्ध समाज सुधारक डॉ. अभय बंग यांनी म्हंटले आहे की, या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न आपल्या जन्माबरोबरच हा प्रश्न ही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही. पण हा शोध सोपा नाही. या जीवनाचे काय करू? कसे जगावे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अभिनव व्याख्यानमाला आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. हा विचारांचा जागर घरोघरी पोहोचावा व देशाच्या भावी पिढीला चांगल्या विचारांची व महापुरुषांच्या विचारांची आज आवश्यकता आहे. याच विचारांच्या बीजाचे रोपण करण्याचे काम गेली अकरा वर्ष सातत्याने अभिनव व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक नवनवीन व प्रसिद्ध व्याख्याते आणून सातत्याने सुरू आहे.
सोमवार ३ मार्च रोजी अॅड. उदयजी मोरे यांचे 'स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब' या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे शहीद रोहित चव्हाण यांचे वीर माता-पिता सौ. वैशाली व तानाजी नामदेव चव्हाण आहेत. मंगळवार ४ मार्च रोजी डॉ. विनोद बाबर यांचे 'माय बाप हो अशी घडवूया पिढी' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे हे प्रमुख पाहुणे आहेत. बुधवार ५ रोजी अविनाश भारती यांचे 'विसरू नको रे आई बापाला' या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे अप्पर तहसीलदार आष्टा राजशेखर लिंबारे हे आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य के. व्ही. बसागरे करणार आहेत. तरी या व्याख्यानमालेचा परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.