For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनंदन वर्धमान आता FLY91 चे पायलट; विमानचालन क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात

11:18 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिनंदन वर्धमान आता fly91 चे पायलट  विमानचालन क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात
Advertisement

गोवा : भारतीय वायुसेनेचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान यांनी विमानचालन क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनंदन यांनी ऑगस्ट महिन्यात गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी FLY91 मध्ये पायलट म्हणून प्रवेश केला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीचा हवाला देत कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

2019 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई संघर्षामुळे अभिनंदन वर्धमान देशभर चर्चेत आले होते. त्या वेळी त्यांनी मिग-21 बायसन विमानातून पाकिस्तानी हवाई दलाच्या एका एफ-16 विमानाचा पाठलाग करत ते पाडल्याचा भारतीय बाजूने दावा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते.

भारताच्या राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर सुमारे 60 तासांनी अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली होती. त्यांच्या धैर्य आणि कर्तव्याप्रती असामान्य समर्पणाबद्दल त्यांना 2021 मध्ये वीर चक्र या युद्धकाळातील भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांपैकी एकाने सन्मानित करण्यात आले.

Advertisement

FLY91 मध्ये सहा विमाने

गोवास्थित FLY91 या प्रादेशिक विमान कंपनीने मार्च 2024 मध्ये व्यावसायिक विमानसेवा सुरू केली. कंपनीकडे सध्या ATR 72-600 प्रकारची सहा विमाने असून गोवा आणि हैदराबाद ही कंपनीची प्रमुख केंद्रे आहेत.

प्रादेशिक हवाई संपर्क वाढविण्यावर देशभरात भर दिला जात असताना अभिनंदन वर्धमान यांचा FLY91 मधील प्रवेश विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमान उडविण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभिनंदन आता प्रवासी विमानाच्या कॉकपिटमधून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Advertisement
Tags :

.