अभिमन्यूचा निकोलोव्हवर विजय
वृत्तसंस्था/बँकॉक
पॅरिस ऑलिम्पिकसाठी येथे सुरु असलेल्या विश्व मुष्टियुद्ध पात्र फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 80 किलो वजन गटातील शनिवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीमध्ये भारताचा राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील मुष्टियोद्धा अभिमन्यू लोराने बल्गेरियाच्या ख्रिस्टेन निकोलोव्हचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
80 किलोवरील वजन गटातील या पहिल्या फेरीतील लढतीमध्ये 21 वर्षीय अभिमन्यूने आपल्या जबरदस्त ठोशांच्या जोरावर निकोलोव्हला 3-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभूत केले. पुरुषांच्या 57 किलो वजन गटात शुक्रवारी भारताच्या सचिन सिवाचने न्यूझीलंडच्या अॅलेक्स मुकूकाचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला होता. या पात्र फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे 7 पुरुष आणि 3 महिला स्पर्धक सहभागी झाले आहेत. रविवारी या स्पर्धेत 63.5 किलो गटात भारताच्या अभिनेश जमवालची तसेच 71 किलो वजन गटात निशांत देवची पहिल्या फेरीतील लढत होणार आहे.