Ratnagiri News : ग्रामीण विकासासाठी मैदानात उतरले अभिजीत गुरव, “सर्वांगिण विकास हा ध्यास”
धोपेश्वर पंचायत समिती गणातून अभिजीत गुरव यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
राजापूर : ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आलो आहोत. माझ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आपण धोपेश्वर पंचायत समिती गणातून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे महायुतीचे उमेदवार अभिजीत गुरव यांनी सांगितले.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासाठी एकदिलाने काम करत असून आपला विजय निश्चित असल्याचे गुरव यांनी सांगितले.भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अभिजीत गुरव हे एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात, भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी तालुक्यात चांगली कामगिरी केली आहे. तर सध्या ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपल्या या पदाच्या माध्यमातून त्यांनी भाजपा संघटना बांधणीसाठी महत्वाचे योगदान दिले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा एक धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला वा जनतेच्या प्रश्नाला जर प्रशासकीय पातळीवर न्याय वा मदत मिळण्यास उशीर झाला तर स्वत: वैयक्तिकरित्या त्या माणसाला मदत करून हातभार लावण्याचे काम गुरव यांनी केले आहे. त्यामुळे आपला हक्काचा माणूस अशी त्यांची धोपेश्वर गणातच नव्हे तर संपूर्ण राजापूर तालुक्यात ओळख आहे.
कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तर पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक विकास कामांना निधी उपलब्ध करून देताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत. त्यामुळे अभिजित गुरव यांच्याकडे काम म्हणजे १००'टक्के होणारच असा जनतेमध्ये विश्वास आहे.
सर्वांगिण विकासाचा आराखडाग्रामीण भागातील विकासासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे नमूद करत भविष्यात धोपेश्वर पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आजही या भागात रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता यांसाख्या समस्या आहेत, त्या आपण सोडवू. पण भविष्यात या गणाच्या विकासाचा एक आराखडा तयार करून या गणाचा सर्वांगिण विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे गुरव यांनी सांगितले.