अभिजीत दीपके : उभे राहणार का नवे नेतृत्व?
राजकारणात अनेकदा एखादी घटना एका व्यक्तीला एका रात्रीत राष्ट्रीय पटलावर आणते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत फारशा परिचयात नसलेले अभिजीत दीपके आज विद्यार्थी आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टी आणि जंतर-मंतरवरील संघर्षामुळे देशभर चर्चेत आहेत. प्रश्न एवढाच आहे की, ही लोकप्रियता क्षणिक आहे की महाराष्ट्राला भविष्यात आणखी एक प्रभावी नेता मिळत आहे? शिक्षणमंत्री प्रधान यांचा राजीनामा होवो किंवा परीक्षा व्यवस्थेत बदल त्याचे श्रेय त्यांना मिळणार हे निश्चित झाले आहे.
यासंपूर्ण घडामोडींची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून झाली. त्यानंतर सामाजिक माध्यमांवरील मोहिमा, अमेरिकेतून एका महाराष्ट्रातील तरुणाने केलेले व्हायरल ट्विट, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि सर्वोच्च न्यायालयातील निरीक्षणांनंतर हा विषय केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाही. गेल्या महिनाभरात आंदोलनाने राष्ट्रीय स्वरूप धारण केले. 6 जूनच्या जंतर-मंतर आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांनी सरकारला इशारा देत ‘हा फक्त ट्रेलर आहे’ असे म्हटले आणि त्यानंतर आंदोलन अधिक व्यापक झाले.
गेल्या आठवड्यात आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे आरोप झाले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन मागे हटणार नसल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी संभाव्य गोंधळ घालण्याचा कट असल्याचाही आरोप केला. या संपूर्ण संघर्षात सोनम वांगचुक यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. सुरुवातीला त्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा दिला. नंतर उपोषण, सरकारशी संवाद आणि अखेरीस पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली. संघर्षाचा केंद्रबिंदू व्यक्ती नसून विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, हा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. याच काळात पोलिसांच्या कारवाईवर देशभर टीका झाली. आंदोलनकर्त्यांवरील लाठीमार, त्यानंतरची माफीची मागणी आणि देशभरातील निदर्शने यामुळे दीपके यांची प्रतिमा केवळ आंदोलनकर्त्याची न राहता नेतृत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीची बनू लागली. आज अनेक जिह्यांत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले तर असे अचानक उभे राहिलेले नेतृत्व नवीन नाही. मनोज जरांगे पाटील हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आंतरवली सराटीत एका लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा आरक्षण आंदोलन राज्यव्यापी झाले आणि जरांगे पाटील राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा बनले. त्या आंदोलनाने पारंपरिक राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिकांचा पुनर्विचार करायला भाग पाडले. आज युवकांच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत, केंद्रात काँग्रेसने आपले आंदोलन वेगळे ठेवले आहे.
अभिजीत दीपके यांची ताकद पारंपरिक संघटनांपेक्षा सोशल मीडिया, डिजिटल नेटवर्क आणि तरुणांशी थेट संवाद यात दिसते. ही नव्या पिढीची असंतोष व्यक्त करण्याची शैली आहे. आजचा तरुण सभा-मेळाव्यांपेक्षा मोबाईल क्रीनवरून नेता स्वीकारतो. त्यामुळे एका व्हिडिओने किंवा एका आंदोलनाने राष्ट्रीय ओळख निर्माण होऊ शकते. तथापि, लोकप्रियता आणि नेतृत्व यात फरक असतो. इतिहास सांगतो की आंदोलनातून पुढे आलेल्या अनेक चेहऱ्यांना संघटन उभारण्यात, व्यापक सामाजिक अजेंडा मांडण्यात किंवा निवडणूक राजकारणात टिकून राहण्यात अडचणी आल्या. त्यामुळे अभिजीत दीपके यांचे भवितव्य केवळ आंदोलनाच्या यशावर नव्हे, तर पुढे ते कोणती राजकीय किंवा सामाजिक दिशा स्वीकारतात यावर ठरेल. किंवा कदाचित ते यातून बाहेरही पडतील.
याच काळात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. एका बाजूला पारंपरिक राजकारणातील संवाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून नवे नेतृत्व उभे राहत आहे. ही दोन वेगवेगळी राजकीय वास्तव आहेत. एक संस्थात्मक राजकारणाचे, तर दुसरे जनभावनांच्या उद्रेकाचे.
भारतीय लोकशाहीत अशा नव्या नेतृत्वाचा उदय हा सत्तेविरोधी भावना, बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेवरील अविश्वास, डिजिटल माध्यमांची ताकद आणि पारंपरिक पक्षांबद्दल वाढती निराशा यांचा एकत्रित परिणाम मानला जाऊ शकतो. त्यामुळे अभिजीत दीपके हे केवळ एका आंदोलनाचे नाव राहतात की महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणारे नेतृत्व ठरतात, याचे उत्तर पुढील काही महिनेच देतील.
सध्या मात्र एक गोष्ट निश्चित आहे जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारा नवा चेहरा म्हणून दीपके यांनी राष्ट्रीय चर्चेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. परंतु प्रत्येक आंदोलनाला इतिहासात स्थान मिळतेच असे नाही; ते मिळते सातत्य, संघटन, व्यापक दृष्टी आणि लोकविश्वास यांच्या बळावर. दीपके यांच्यासमोरही आता हाच खरा कस लागणार आहे. आभासी दुनियेत वावरणारी मुलं एकत्र काय येणार? या प्रश्नाला जबाब देणारी गर्दी दिल्ली बरोबर आता मुंबई आणि देशातील अनेक राज्याच्या राजधान्यांमध्ये रस्त्यावर उतरून इशारे देताना आणि शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागताना दिसत आहे. ही गर्दी पुढे काय करेल, कोणती मजल मारेल माहीत नाही. मात्र तिला एकत्र आणणारा युवा आवाज महाराष्ट्रातून उठला हे मात्र निश्चित.
शिवराज काटकर