स्क्वॅशमध्ये अभय-अनाहत यांना रौप्य
दोन्ही खेळाडूंचे गोल्ड हुकले : लांब उडीत अॅन्सीचे रुपेरी यश : उंच उडीत नाशिकच्या सर्वेशचा रुपेरी धमाका
वृत्तसंस्था / नागोया
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 18 वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंगने महिला एकेरीत रौप्यपदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात महिला एकेरी स्क्वॅशमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याशिवाय, पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अभय सिंहलाही रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली, तरी एकेरी प्रकारात एकाच दिवशी दोन रौप्यपदके जिंकून भारताने स्क्वॉशच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. तसेच महिलांच्या लांब उडीत अॅन्सी सोजनने रौप्यपदक जिंकले आहे. नवी मुंबईच्या हरिता भद्राने 200 मी शर्यतीत कांस्य तर डेकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरने कांस्यपदकाची कमाई केली. दरम्यान, रविवारी भारतीय संघाने सात पदके जिंकली. यासह पदकतालिकेत भारत 4 सुवर्ण, 16 रौप्य आणि 17 कांस्यपदकासह एकूण 37 पदके जिंकत 12 व्या स्थानी आहे.
स्क्वॅश क्रीडा प्रकारात शनिवारी अनाहत आणि अभय यांनी फायनल गाठत गोल्ड मेडलच्या आशा पल्लवित केल्या होत्या. रविवारी सकाळच्या सत्रात महिला एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या अव्वल मानांकित शिवसंगरी सुब्रमण्यमकडून अनाहतला 4-11, 4-11, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यातील पराभवामुळे अनाहतचे 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशाचे स्वप्न अवघ्या एका पावलाने हुकले आहे.
अभय सिंहलाही रौप्य
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अभय सिंहलाही रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत मलेशियाच्या इन यो एनजीने अभयचा 11-9, 11-5, 11-5 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सौरव घोषालनंतर (2014 आणि 2023) आशियाई स्पर्धेतील पुरुष एकेरीत रौप्य जिंकणारा अभय हा भारताचा दुसराच खेळाडू ठरला. त्यालाही ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळवता आले नाही. मलेशियन इन योने सुवर्णपदकाची कमाई केली.
लांब उडीत अॅन्सी सोजनचे सुवर्ण थोडक्यात हुकले
दरम्यान, महिलांच्या लांब उडी प्रकारातील फायनल चुरशीची ठरली. भारताच्या अॅन्सी सोजन अखेरच्या क्षणापर्यंत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र, अंतिम प्रयत्नात चीनच्या हुआंग यिंगयिंगने बाजी पलटवली. हुआंगने 6.55 मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत एन्सीपेक्षा अवघ्या 2 सेंटिमीटरच्या फरकाने सुवर्णपदक पटकावले. एन्सीला तिच्या 6.53 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात भारताच्या शाईली सिंगने निराशा केली. ती चौथ्या स्थानावर राहिली. चीनच्या टॅनने कांस्यपदक जिंकले.

नाशिकच्या सर्वेश कुशारेचे उंच उडीत रुपेरी यश
नाशिकच्या सर्वेशने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताची तब्बल 56 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. 1970 नंतर आता भारताला त्याने पुन्हा एकदा उंच उडीमध्ये पदक मिळवून दिले आहे. सर्वेशने अंतिम फेरीत 2.25 मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याची उडी चायनीज तैपेईच्या चाओ-हुसान फू याच्याइतकीच म्हणजे 2.25 मीटर होती. मात्र, काउंटबॅकच्या नियमानुसार फूने सुवर्णपदक पटकावले आणि सर्वेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेशच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. 
स्टीपलचेसमध्ये पारुल चौधरीला कांस्य
भारताची स्टार धावपटू पारुल चौधरीने महिलांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये शानदार कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले. पारुलने 9:08.67 सेकंदांची वेळ नोंदवत शर्यत पूर्ण केली आणि त्याचबरोबर स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. या शर्यतीत बहरीनच्या विनफ्रेड यावीने 9:04.36 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावत नवा गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. कझाकस्तानच्या नोराह जेरुटोने 9:06.82 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. 
डेकॅथलॉनमध्ये तेजस्विनला कांस्यपदक
भारताच्या तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. जपानच्या युमा मारुयामाने 8123 गुणासह सुवर्ण जिंकले. चीनच्या के जेंगने 8012 गुणासह रौप्य तर तेजस्विनने 7934 गुणासह कांस्यपदक पटकावले. मागील आशियाई स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले होते, पण यंदा त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
नवी मुंबईच्या हरिता भद्राची कमाल, 200 मी. शर्यतीत जिंकले कांस्य
नवी मुंबईच्या धावपटू हरिता भद्राने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत सेकंदाच्या 100 व्या भागाच्या (0.01 सेकंद) फरकाने अत्यंत थरारक कांस्यपदक पटकावले. हरिताने 23.20 सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले, तर जपानची इडो अबिगेइरुफुका 23.21 सेकंदांसह चौथ्या स्थानावर फेकली गेली. या अंतिम शर्यतीत सिंगापूरच्या शांती परेराने 22.78 सेकंदांसह सुवर्ण, तर चीनच्या चेन युजीने 22.93 सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. याच शर्यतीत भारताची दुसरी अॅथलिट उन्नती अयप्पाने 23.48 सेकंदांच्या वेळेसह सहाव्या क्रमांकावर राहिली.
महिला हॉकीत भारताचा धडाका कायम, सिंगापूरला नमवले
भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या अंतिम गट फेरीच्या सामन्यात सिंगापूरला 7-0 ने पराभूत केले. आता, उपांत्य फेरीत भारतीय संघाची लढत दि. 30 रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध होईल. रविवारी सिंगापूरविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी शानदार खेळ साकारला. भारताकडून सलिमा टेटे 17 वे मिनिट, सुनेलिता 22 व 24 वे मिनिट, लालरेसियामी 26 वे मिनिट, ऋतुजा 29 वे मिनिट, निक्की प्रधान 35 वे मिनिट आणि दीपिका 55 वे मिनिट यांनी गोल केले. सिंगापूर संघाला एकही गोल नोंदवता आला नाही.
सिंधूचे आशियाई स्पर्धेतून पॅकअप
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुला रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या चेन यू फेईकडून 21-11, 18-21, 10-21 असा पराभवाचा सामना करावा लागला. पराभवासह एशियन गेम्स 2026 मध्ये तिचा प्रवास संपुष्टात आला आहे. दरम्यान, पी. व्ही. सिंधुचा मागील 24 तासांतील हा तिसरा सामना होता. त्यामुळे तिला काही प्रमाणात थकवा आला होता. याचा तिला फटका बसला.