जम्मू-काश्मीर मुख्यमंत्रीपदी अब्दुल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन, काँग्रेस सरकारबाहेर, पाच मंत्र्यांचा समावेश
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रथम मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शपथग्रहण केले आहे. येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय सभा केंद्रात आयोजित एका शानदार समारंभात त्यांना उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. नौशेरा मतदार संघातून निवडून आलेले आमदार सुरिंदर चौधरी यांनीही मंत्री म्हणून शपथग्रहण केले असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
या दोन्ही नेत्यांप्रमाणेच नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेत्या साकीना इट्टू, जावेद राणा, जावेद दर तसेच अपक्ष आमदार सतीश शर्मा यांनाही मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, डावे नेते डी. राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच जम्मू-काश्मीरमधील अनेक स्थानिक नेते आणि अधिकारी यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन
ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ते या प्रदेशातील जनतेची योग्य प्रकारे सेवा करतील, अशी अपेक्षा आहे. या प्रदेशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार अब्दुल्ला यांच्या सरकारला सहकार्य करेल. अब्दुल्ला यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवर पाठविला आहे.
काँग्रेस सरकारबाहेर
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 90 पैकी 42 जागा जिंकल्या आहेत. या पक्षाने काँग्रेससमवेत युती करुन निवडणूक जिंकली होती. काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. युती विजयी झाल्याने काँग्रेसचाही सरकारमध्ये सहभाग असेल असा समज होता. तथापि, काँग्रेसने या सरकारबाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शपथविधी कार्यक्रमाला काँग्रेसचेही अनेक वरीष्ठ नेते उपस्थित होते. तथापि, सरकारमध्ये काँग्रेसचा समावेश नसल्याने राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अपक्षांचा पाठिंबा
ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला चार अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्यापैकी तीन अपक्ष जम्मू विभागातून निवडून आले आहेत. एका अपक्षाचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला आहे. जम्मू या हिंदुबहुल भागातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 29 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसला जम्मू भागात केवळ एक जागा मिळाली असून नॅशनल कॉन्फरन्सलाही एक जागा मिळाली आहे. अपक्षांच्या पाठिंब्यामुळे जम्मू भागालाही सरकारमध्ये समतोल प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासंबंधीचे चित्र अब्दुल्ला मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
जम्मूकडे दुर्लक्ष करणार नाही
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू विभागाकडे आपल्या सरकारचे दुर्लक्ष होणार नाही, असे आश्वासन दिले. जम्मू विभागातून निवडून आलेल्या दोन नेत्यांना सध्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. जम्मू विभागाच्या विकासाचाही विचार समतोल पद्धतीने करण्यात येईल. सत्ताधारी युतीचे जम्मू भागातून अत्यल्प आमदार निवडून आले असले तरी सरकार या भागाच्या विकासासंबंधी सकारात्मक राहणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या सरकारचा भर विकास आणि शांतता या दोन बाबींवर राहणार आहे. सर्व समाजघटकांना हे सरकार न्याय देईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.