रामेश्वराच्या पालखी सोबतचे अब्दागीर उद्या देवस्थानकडे करणार सुपूर्द
मालवण/प्रतिनिधी
मांजरेकर कुटुंबियांच्या अभिमानाचे दर्शक असलेल्या तसेच श्री देव रामेश्वर पालखीची मागील सुमारे ७० - ७२ वर्षांपासून सोबत असलेल्या या नविन अबदागिराची येत्या शुक्रवारी, दि. १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर दुपारी ४:०० वाजता भगवान निवास रेवतळे, मालवण येथे विधीवत पुजाअर्चा करून नंतर रेवतळे ते भरडनाका मार्गे एसटी स्टॅन्ड, देऊळवाडा अशी भव्य मिरवणूक करून शेवटी ते मानाचे पूजनीय अब्दागीर श्री देव रामेश्वर मंदिर देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.मालवण पंचक्रोशीतील सर्वच नागरिक किंवा रहिवासी यांना माहिती असेलच की मालवणचे देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांची पालखी असते. वर्षातील काही विशिष्ट दिवस श्री देव रामेश्वर मंदिरात आणि श्री देव नारायण मंदिर तसेच श्री देवी सातेरीच्या मंदिरात आणि महोदयाच्या वेळी देव देवता समुद्रस्नान करण्यासाठी श्री देव मोरेश्वर, दांडी येथे (मोरयाच्या धोंड्याकडे) जातात तेव्हा व दिवाळी दिवशी देऊळवाडा ते आडवण,वायरी, मोरयाचा धोंडा, काळबा देवी असा मार्गक्रमण करून श्री देव रामेश्वरची पालखी सोमवार पेठ मधील रामेश्वर मांड येथे दिवाळीच्या रात्री दाखल होते. आणि काही काळ ही पालखी मिरवणूक तेथे विश्रांती घेते. त्यानंतर रात्री उशिरा रामेश्वर मांड येथून निघून पुन्हा पालखीची मिरवणूक बाजारपेठ व भरडनाका मार्गे देऊळवाड्याला श्री देव रामेश्वर मंदिरात विसर्जीत होते. पालखी सोबत छत्र, चामर आणि अब्दागीर असतात.
मालवणचे रहिवासीच काय परंतु रेवतळे येथील आमच्या मांजरेकर कुटुंबातील तरुण पिढीला देखील माहिती नसेल की पालखीसोबत जे अब्दागीर असते ते १) स्व. श्री. शिवा भगवान मांजरेकर (तात्या) २) स्व. श्री. नारायण भगवान मांजरेकर (बाबा ) ३) श्री. दत्ताराम भगवान मांजरेकर (आबू काका) आणि ४) स्व. श्री हरिश्चंद्र भगवान मांजरेकर (भाली) यां चार मांजरेकर बंधूनी मांजरेकर परिवार, रेवतळे यांच्यातर्फे आपले स्व. वडील श्री भगवान शिवा मांजरेकर (दादा):यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री देव रामेश्वर देवस्थानास भेट स्वरूपात अर्पण केले होते आणि सुमारे १९५५-६० च्या दरम्यान ही परंपरा सुरु केली तेव्हा पासून हा मान रेवतळे येथील मांजरेकर कुटूंबियांना देवस्थान देत आलं आहे. त्या बद्दल समस्त मांजरेकर कुटुंबीय देवस्थानाचे आभारी आहेत.
१९६० नंतर जेव्हा जेव्हा ते अब्दागीर जुनं झालं किंवा त्याचं कापड जीर्ण झालं, वेळोवेळी श्री भगवान शिवा मांजरेकर यांच्या पुढच्या चार पिढयांनी त्याचे नूतनिकरण केले होते. आता सन २०२३ मध्ये स्व. श्री भगवान शिवा मांजरेकर (दादा) यांची पाचवी पीढी या अब्दागीराचे सकल मांजरेकर कुटूबीयांच्या वतीने पूर्णपणे नूतनीकरण जयपूर, राजस्थान येथून कुशल कारागीरांकडून करून घेतलं आहे.
अशा या मानाच्या व मांजरेकर कुटुंबियांच्या अभिमानाचे दर्शक असलेल्या तसेच श्री देव रामेश्वर पालखीची मागील सुमारे ७० - ७२ वर्षेपासून साथ सोबत असलेल्या या नवीन अबदागिराची येत्या शुक्रवारी ती देवस्थानकडे देण्यात येणार आहे.