प्रयत्नपूर्वक वाढवलेल्या सत्वगुणाचाही त्याग?
अध्याय नववा
सत्वगुणी माणसाला मरणोत्तर उत्तम गती मिळते ह्या बाप्पांच्या वचनावर विश्वास ठेऊन भक्त स्वभावात बदल करण्याचा प्रयत्न सुरु करतो. त्यासाठी शास्त्रवाचन, हरिकथा श्रवण, संत चरित्रांचा अभ्यास ह्या साधनांचा वापर करतो. स्वभावात बदल घडवून आणण्याचा अभ्यास माणसाने जरूर करावा पण ईश्वरी कृपेखेरीज मी माझ्या बळावर स्वभावात बदल करून तो सत्वगुणी करीन असं माणसाने म्हंटलं तर ते अशक्य आहे. हे ओळखूनच स्वभावाला औषध नाही किंवा सूंभ जळला तरी पीळ जळत नाही, असे वाक्प्रचार तयार झाले आहेत. मूळ स्वभाव चटकन बदल होत नाही असाच ह्याचा अर्थ आहे. वाघ्याचा झाला पाग्या तरी मूळ स्वभाव जाईना असंही म्हणतात. म्हणजे एखाद्या कामगाराचा मोठा अधिकारी झाला तरी, किरकोळ गोष्टीत वाद करण्याचा त्याचा मूळ स्वभाव किंवा त्याच्या सवयी बदलत नाहीत. थोडक्यात स्वभावात स्वप्रयत्नानं बदल घडवून आणणं अगदी अशक्य आहे पण ईश्वरी कृपा लाभल्यावर अशक्य ते शक्य होऊ शकतं ह्याचा अनुभव आपणही नेहमी घेत असतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मानवी प्रयत्नांबरोबर देवाची साथ आवश्यकच असते.
तेव्हा मी कर्ता नाही याची दृढ खूणगाठ मनाशी बांधून ईश्वरावर अत्यंत श्रद्धा ठेवून माझा स्वभाव सत्वगुणी होऊ देत अशी मनापासून त्याला प्रार्थना करावी. अशी कळकळ लागली की, त्याच्या कृपेने हे शक्य होते पण त्यासाठी मी नाही आणि तू आहेस याची पक्की खात्री व्हायला हवी म्हणजे सर्व त्याच्यावर सोपवून आपल्याला स्वस्थ राहता येतं. आता याच्या पुढील टप्पा असा आहे की, आपल्याला सत्वगुणाचं महत्त्व लक्षात आलेलं असल्याने तो होताहोईतो अचूक म्हणजे सत्वगुणी माणूस ज्या प्रमाणे वागेल तसे वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुणी कसंही वागलं तरी त्याच्यावर न रागावणे, त्याला अपशब्द बोलून त्याचा अपमान न करणे ह्या प्रमाणे वागण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्याला आपण सत्वयुक्त होण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात ठेवावं लागतं आणि त्याबरहुकूम वागावं लागतं. असं खूप काळ निष्ठेनं करत राहिल्यावर ईश्वरी कृपा होते व आपला स्वभाव बदलतो. इतका की, आता आपल्याला आपण सत्वगुणी माणसासारखे वागायचं आहे, हे त्याला लक्षात ठेवावं लागत नाही.
त्याची वर्तणूक आपोआपच तशी होत जाते. अशावेळी रज व तम गुण त्याच्या स्वभावातून हद्दपार झालेलेच असतात आणि स्वभावच सत्वगुणी झाल्यामुळे सत्वगुणाचीही त्याला गरज वाटत नाही. कसे ते आपण समजून घेऊ. अष्टावक्र गीतेत जनकराजाला अष्टावक्रमुनी तू सत्वगुणाचाही त्याग कर असा उपदेश करतात. रज, तम गुणांचा त्याग हे आपण समजू शकतो परंतु सत्वगुणाचा त्याग कशासाठी करायचा हे लवकर लक्षात येत नाही. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय ईश्वराची भेट घडत नाही असे शास्त्रवचन आहे. त्यादृष्टीने भक्ताचा रज, तम गुणांना निष्प्रभ करायचा प्रयत्न चालू असतो व ईश्वराच्या कृपेने तो सफल होऊन त्याच्या स्वभावात सत्वगुणाची वाढ होते, हे आपण बघितलं. आता वाढलेल्या सत्वगुणाचा त्याग करायला मुनी सांगत आहेत. त्यातून त्यांना काय म्हणायचं असेल ह्यावर विचार केल्यावर लक्षात येते की, वाढलेल्या सत्वगुणामुळे स्वभाव सात्विक होतो. एकदा स्वभाव सात्विक झाला की, त्याची वर्तणूक कायमच सात्विक होत राहते. आपण सात्विक माणसासारखं वागायचं आहे, हे त्याला लक्षात ठेवावे लागत नाही. त्यामुळे त्याने सत्वगुणाचा त्याग केल्यासारखे होते. जी गोष्ट आपल्याला लागत नाही ती आपल्या जवळ असली काय व नसली काय सारखेच असते. कारण आपल्या दृष्टीने तिचे महत्त्व संपलेले असल्याने आपण तिचा त्याग केला असे म्हणू शकतो.
क्रमश?