अब हारना मना है!
काही सामने मोक्याच्या क्षणी हरल्यानंतर झिम्बाब्वेसारखा संघही ऑस्ट्रेलियासारखा वाटू लागलाय. भारताने झिम्बाब्वेवर काय बोलायचं हे जर आपण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला असता तर हे बोलणं योग्य झालं असतं. आपण आफ्रिकेविरुद्ध हरलो आणि आता झिंबाब्वेविरुद्ध सुद्धा त्यांचे नाव आदराने घ्यावे लागते. एका पराभवाने भारतीय संघ 360 डिग्रीत फिरला. या स्पर्धेने आपले चढ-उतार अगदी व्यवस्थित दाखवले आहेत. थोडक्यात काय, तर क्रिकेट हा आपल्या खेळाला जागतोय. कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे समीकरणं बरीच बदलत आहेत. आज आपली लढत आहे ती झिंबाब्वेविरुद्ध. झिंबाब्वे हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटलावर ना दादा संघ, ना बादशहा संघ. परंतु त्यांचे दोन प्रथितयश संघाविरुद्धचे विजय त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास पुरेसे आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भळभळती जखम दिली आहे का? तर त्याचं उत्तर निश्चित नाही, असंच आहे. परंतु या पराभवाने आपण बऱ्यापैकी खरचटलो आहोत, हेही विसरून चालणार नाही.
पहिल्या चार सामन्यांतील विजयाने आपल्याला आनंद मिळाला होता परंतु समाधान नव्हतं, हे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं. सुख म्हणजे काय असतं ‘तो’ विजय आपल्याला अपेक्षित आहे. भारतीय फलंदाजांसाठी समोरच्या वेगवान गोलंदाजांचे स्लोवरवन ट्रेडमार्क ठरू पाहत आहेत. आजकाल भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ क्रिकेटच्या देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून ऑफब्रेक गोलंदाज आणि ऐनवेळी स्लोअरवन टाकण्याची कला अवगत व्हावी, असाच ‘वर’ मागून घेतात. अक्षरला वगळून सुंदरला संघात घेणे किती घातक ठरलं हे तुम्हा आम्हा सर्वांनी अनुभवलं. भारतीय फलंदाजांकडे प्रतिभा आणि प्रतिमा दोन्ही आहेत. परंतु प्रत्येक चेंडू षटकारच गेला पाहिजे, या गोष्टीला मुरड घातली पाहिजे. काल-परवा तर गावसकर सरांनी चौकाराने धावा येतात याची आठवण करून दिली. एकेरी-दुहेरी धावा टी-20 मध्येही घ्याव्या लागतात, हे कदाचित भारतीय संघ विसरला असावा. हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ आक्रमणात ‘दादा’ होता. परंतु दोन दिवसापूर्वी वेस्ट इंडीजने आक्रमणातील नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. तुम्हाला जर आक्रमणच करायचं असेल तर असं आक्रमण अपेक्षित आहे. या दोन्ही सामन्यांत ‘हारना मना है’ त्याची सुरुवात आजच्या सामन्याने करायलाच हवी. पुन्हा एकदा भारतीय क्षेत्रक्षण हा कळीचा मुद्दा ठरतोय. झेल सुटल्यानंतर वेस्ट इंडीजच्या हेटमायरने काय केलं, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. खऱ्या अर्थाने त्याने मैदानावर ‘धुरळा’ उडवून दिला होता. हाच धुरळा भारताला आता दोन्ही सामन्यांत उडवायचा आहे. आता अभिषेकवर आणखी किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न भारतीय व्यवस्थापनेसमोर निश्चितच पडलेला असणार. दुसरीकडे सुंदरऐवजी अक्षर संघात येणे गरजेचे आहे. परंतु अभिषेकला संघात ठेवत पुन्हा एकदा भारतीय संघ अभिषेकवर मोठी बोली लावणार का, हे बघणं आता गरजेचं आहे.
2024 मधील भारताचं टी-20 मधील निर्विवाद वर्चस्व. 2025 मधील खिशात घातलेली चॅम्पियन्स ट्रॉफी. 2026 च्या सुरुवातीलाच टी-20 मधील दबदबा आणि त्यानंतर 2026 टी-20 मधील पहिल्या चार विजयानंतर नंतरच्या एका पराभवाने बिघडलेला समीकरणाचा खेळ. परंतु हे समीकरण जर सरळ करायचं असेल तर प्रथम आफ्रिकेचा विंडीजवर विजय आणि त्यानंतर भारताचा झिंबाब्वेवर विजय अपेक्षित आहे. कारण इथून पुढे भारतीय संघासाठी ‘हारना मना है’ ही टॅगलाईन सुरु होईल. कधीकधी काही पराभवातून पुढील विजयाची गुढी उभारली जाते. परंतु तो पराभव आफ्रिकेविरुद्धचा असणार काय, याचे उत्तर येणारा काळच देईल. थोडक्यात काय, भारतीय संघासाठी पुढील पराभव हा नाय! नो! नेव्हर! म्हणण्यासारखंच आहे.