For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अब की बार...सगळीकडेच खिंडार!

06:30 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अब की बार   सगळीकडेच खिंडार

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड आता अंतिम टप्प्यात आलेली असताना नाराजीनाट्यांचे प्रसंग वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही नाराजीनाट्या सुरु झाले आहे. उमेदवाराची निवड पक्षाच्या नेत्यांसाठी सध्याला तरी डोकेदुखीची ठरत आहे. कोलारमध्ये उमेदवार निवडीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद दिसून आली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा बंड करुन निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना पक्षश्रेष्ठींना यांची मनधरणी करणे अवघड जात आहे.एकंदरच निवडणुकीतील वातावरण तीव्र उन्हाळ्याप्रमाणे अधिकच तापत आहे, हे नक्की.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना उमेदवार ठरविणे डोकेदुखीचे ठरू लागले आहे. एका जागेवर अनेक इच्छुक अशी परिस्थिती असल्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळत नाही, साहजिकच ते बंड करतात. सध्या कर्नाटकात असेच चित्र पहायला मिळते. सत्ताधारी काँग्रेस व भाजप-निजद युतीचे उमेदवार जवळजवळ ठरले आहेत. काही जागांवर केवळ उमेदवारी जाहीर करणे बाकी आहे. बुधवारी तर कोलारच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना घाम सुटला. मंत्री के. एच. मुनियप्पा यांचे जावई चिक्कपेद्दण्णा यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. मुनियप्पा यांनी पक्षश्रेष्ठींवर यासाठी दबाव आणला आहे. चिक्कपेद्दण्णा यांना उमेदवारी देऊ नये म्हणून कोलार जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी नेतृत्वावर दबाव वाढवला आहे. पाच आमदारांनी तर राजीनामा देण्याची तयारी ठेवली आहे. आपल्या जावयाला उमेदवारी मिळाली नाही तर आपणही राजीनामा देऊ असे मुनियप्पा यांनी जाहीर केले आहे.

कोलारचा तिढा वाढतो आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. समस्या असेल तर चर्चेने संपविता येते. त्यामुळे कोणीही टोकाची भूमिका घेऊ नका, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी विधानसभेत पोहोचलेले पाच आमदार माघारी परतले आहेत. यावरून उमेदवारीसाठी कशी रस्सीखेच सुरू आहे, हे दिसून येते. केवळ काँग्रेसमध्येच अशी परिस्थिती आहे, असे नाही. भाजपची स्थितीही याहून वेगळी नाही. शिमोगा लोकसभा मतदारसंघात तर के. एस. ईश्वरप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच बंडाचा झेंडा उभारला आहे. दावणगिरी, कोप्पळ, बेळगावमध्येही कमी जास्त प्रमाणात नाराजी आहेच. अनेक ठिकाणी स्थानिकांना उमेदवारी दिली नाही. खासकरून बेळगावच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्यासह विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ व इतर अनेक नेते इच्छुक होते. यावेळी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, याची शंकरगौडा पाटील यांना खात्री होती.

Advertisement

सर्व शक्यता फोल ठरवून पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे बेळगावला आले होते. बेळगावप्रमाणेच कोठे कोठे नाराजी आहे, तेथे समेटाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागेवर माजी मंत्री विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. कोडगू-म्हैसूरचे खासदार प्रतापसिंह व अनंतकुमार हेगडे हे प्रखर हिंदुत्वाच्या प्रतिपादनामुळे ठळक चर्चेत होते. आपल्या काही वादग्रस्त विधानांमुळे अनंतकुमार हेगडे हे नाव विरोधकांबरोबरच स्वकियांच्या तोंडातही होते. हे विधानच त्यांना अंगलट आल्याचे दिसून येते. यावरून याआधीसारखे प्रखर हिंदुत्वापासून पक्ष दूर जातो आहे का? कर्नाटकातील संख्याबळ वाढविण्यासाठी अशी भूमिका घेण्यात आली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

सर्व 28 जागा जिंकण्यासाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू आहे. यासाठीच प्रत्येक मतदारसंघात पक्षापासून यापूर्वी दूर गेलेल्या नेत्यांचीही मोट बांधली जात आहे. खाणसम्राट जनार्दन रे•ाr यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण राज्य प्रगती पक्ष नामक नवा पक्ष स्थापन केला होता. या पक्षाच्या चिन्हावरच ते आमदार झाले. त्यांची पत्नी लक्ष्मी अरुणा यांनी बळ्ळारीमधून नशीब आजमावले. जनार्दन रे•ाr यांच्या बंधूंचा त्यामुळे पराभव झाला. आता जनार्दन रे•ाr यांनी कर्नाटक राज्य प्रगती पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते पुन्हा भाजपवासी झाले आहेत. आजवर भाजपचे नेते त्यांच्यावर कडाडून टीका करायचे. जनार्दन रे•ाr ही व्यक्ती भ्रष्ट आहे, खाण घोटाळ्याच्या माध्यमातून त्यांनी जे काही केले आहे, ते लपून राहिले नाही.

कर्नाटकात 2006 मध्ये भाजप-निजद युतीची सत्ता स्थापन झाली. तत्कालिन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर लाचखोरीचे आरोप करीत जनार्दन रे•ाr ठळक चर्चेत आले होते. त्यानंतर येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते पर्यटनमंत्री होते. 2011 बेकायदा खाण घोटाळ्यात त्यांना सीबीआयने अटक केली. सीबीआय, सीआयडी, ईडी, लोकायुक्त, प्राप्तीकर आदी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी त्यांच्यावर दाखल केलेले 20 हून अधिक खटले अद्याप सुरू आहेत. अशी पार्श्वभूमी असलेले जनार्दन रे•ाr हे भाजपवासी झाले आहेत. जे इतर राज्यात चालले आहे, तेच कर्नाटकातही सुरू आहे. निवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी लोकायुक्त पदावर असताना घोटाळेबाजांकडून राज्याची नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी मोठे पाऊल उचलले होते. आता याचा साऱ्यांनाच विसर पडला आहे. लोकसभेत विजय मिळविणे हे एकच राजकीय पक्षांचे प्रमुख ध्येय आहे, हे यावरून स्पष्ट होते.

कर्नाटकात उष्मा वाढला आहे. त्यामुळे साहजिकच पाणीसमस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या उकाड्यामुळे रोगराईही वाढली आहे. उलटी, जुलाब, नाकातून रक्तस्राव, टॉयफाईड, थंडताप, चिकन पॉक्सचे रुग्ण वाढले आहेत. उष्माघातापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक जागृतीची गरज आहे. बारावीची परीक्षा सुसूत्रपणे पार पडली आहे. दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. 8 लाख 69 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पहिल्याच दिवशी 15 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. परीक्षांचा काळ, लोकसभा निवडणुकीची धामधूम यातच वाढता उकाडा आदींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या रोगराईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. खासकरून ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढती आहे. परिस्थिती हाताळण्याची मोठी जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मात्र, सरकार सध्या निवडणुका जिंकण्याच्या शर्यतीत आहे.

Advertisement
Tags :
×

.