For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’च्या राघव चड्ढा यांना राज्यसभा सदस्यत्व बहाल

06:40 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘आप’च्या राघव चड्ढा यांना राज्यसभा सदस्यत्व बहाल
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेने सोमवारी आम आदमी पक्षाचे सदस्य राघव चड्ढा यांचे निलंबन मागे घेत त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली. पावसाळी अधिवेशनात 11 ऑगस्ट रोजी चड्ढा यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मध्यान्ह भोजनाच्या विश्र्रांतीनंतर दुपारी दोन वाजता वरिष्ठ सभागृहाची बैठक सुरू झाली तेव्हा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सीपीआय(एम)चे इलमराम करीम यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले. या अहवालात चड्ढा यांच्यावरील कारवाईबाबतचे विवेचन करण्यात आले आहे. त्यानंतर समितीच्या अहवालाचा दाखला देत 11 ऑगस्ट 2023 पासून सदनाच्या सदस्याचे निलंबन ही न्यायाच्या उद्देशाने पुरेशी शिक्षा आहे. या अहवालाचा दाखला देत त्यांनी आम आदमी पक्षाचे सदस्य राघव चड्ढा आत्मपरीक्षण करतील आणि भविष्यात सभागृहाच्या प्रतिष्ठेनुसार आणि परंपरेनुसार वागतील अशी आशा व्यक्त केली. यानंतर भाजपचे जीव्हीएल नरसिंह राव यांनी चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करणारा ठराव मांडला. यानंतर सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करत अध्यक्षांनी आप सदस्याला सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली.

11 ऑगस्ट रोजी सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राघव चढ्ढा यांना निलंबित करण्यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठ सभागृहाने स्वीकारला होता. दिल्ली पॅपिटल टेरिटरी (सुधारणा) विधेयक, 2023 सभागृहाच्या निवड समितीकडे पाठवण्याचा आणि सभागृहातील काही सदस्यांची संमती न घेता प्रस्तावित समितीसाठी नाव दिल्याचा चड्ढा यांच्यावर आरोप होता. वरिष्ठ सभागृहातील काही सदस्यांच्या तक्रारीवरून हे प्रकरण नंतर विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर चड्ढा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आप नेत्याला राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर याप्रकरणी आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यातच चड्ढा यांनी राज्यसभा अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेत दिलगिरी व्यक्त केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.