‘आप’चे गोवा सह प्रभारी दीपक सिंगला यांना अटक
ईडीकडून गोव्यासह दिल्लीत छापासत्र
पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चंदीगड विभागाने काल सोमवारी सकाळी गोव्यात दोनापावला येथे तसेच दिल्लीत व अन्य ठिकाणी छापे टाकले. आम आदमी पक्षाचे गोव्याचे सह-प्रभारी दीपक सिंगला यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे मारल्यानंतर त्यांना दिल्लीत अटक केली आहे. ही कारवाई 100 कोटीहून अधिक बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील मनी-लाँडरिंगच्या तपासाशी संबंधित आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
सोमवारी सकाळी ईडीच्या पथकांनी गोव्यातील दोनापावला आणि दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. यासोबतच दिल्लीतील ‘आप’चे दुसरे नेते आणि व्यावसायिक राम सिंह यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानावरही 180 कोटी ऊपयांच्या हेराफेरीच्या आरोपाखाली तपास यंत्रणेकडून शोधमोहीम राबवली जात आहे. यामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या चंदीगढ झोनमध्ये दाखल असलेल्या एका गुह्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणा बँकांचे आर्थिक व्यवहार, संशयास्पद कंपन्या आणि वित्तीय कागदपत्रांची पडताळणी करत होती. त्यानंतर पूर्व दिल्लीच्या स्वास्थ विहार येथील दीपक सिंगला यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आतमध्ये अधिकाऱ्यांकडून डिजिटल उपकरणे, बँक खाती आणि मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील बदरपूर भागातील दिग्गज नेते आणि ‘बाबाजी फायनान्स ग्रुप’चे मालक राम सिंह यांच्यावर जनता आणि बँकांची फसवणूक करून 180 कोटी ऊपयांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप आहे. राम सिंह हे दिल्ली विधानसभेचे माजी आमदार राहिले असून, निवडणुकीदरम्यान सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश असायचा. ईडी सध्या या दोन्ही नेत्यांच्या व्यावसायिक भागीदारी आणि कथित फसवणुकीच्या रकमेचा नेमका वापर कुठे व कसा केला गेला, याचा शोध घेत आहे. या कारवाईमुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
दीपक सिंगला यांना यापूर्वीही अटक
दीपक सिंगला हे ‘आप’चे वरिष्ठ नेते असून त्यांनी 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती, तसेच ते गोव्याचे पक्ष सहप्रभारी म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी 2024 मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतरही त्यांच्या घरावर छापेमारी झाली होती.