'आपल विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’चा गुरूवारी जयघोष
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराच्या विरोधात कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून गुरूवार 26 मार्च रोजी सकाळी 10 ते 10.15 या वेळेत विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांच्या वतीने ‘आपल विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा जयघोष केला जाणार आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये या मागणीचे निवेदन कुलगुरूंना दिले जाईल, असा निर्णय शनिवारी सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे होते.
सतीशचंद्र कांबळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराचा प्रश्न 62 वर्षानंतर उपस्थित करण्यात मोठे षडयंत्र आहे. टी. एस. पाटील म्हणाले, चार पानाचे पांप्लेट काढून शिवाजी विद्यापीठाचा इतिहास तळा-गाळापर्यंत पोहचवला पाहिजे. डी. यु. पवार म्हणाले, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अस्तित्वात आहे. हे सरकारच्या लक्षात आणून दिले पाहिजे. एकदा केलेला कायदा बदलता येणार नाही. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशांमध्ये गलिच्छ राजकारण सुरू असून जशास तसे उत्तर दिल्याशिवाय सत्तेतील लोकांना जाग येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. परराज्यातील आमदार कोल्हापुरात येवून आम्हाला शिकवत असतील तर कोल्हापूरकर खपवून घेणार नाहीत. अभिषेक मिठारी म्हणाले, कोल्हापुरात नामविस्ताराचा प्रश्न करण्यामागचा अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून होतोय. विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव आणून आम्ही आमचे काम केले. हा चेंडू आता जनतेच्या कोर्टात गेला आहे. विद्यार्थी, पदवीधर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण संस्था, पेठापेठांमधील तालमींचे निवेदन राज्यपाल, सरकारपर्यंत गेले पाहिजे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, आपण पहिल्यांदा आपल्या घरच्यांना आणि आसपासच्या लोकांना आपल्या शिवाजी विद्यापीठ नाव का असलं पाहिजे, हे सांगावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरातील आजी-माजी सिनेट सदस्य, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आदी पेठांमधील तालीम मंडळांच्या बैठका घेवून त्यांची निवेदने सरकारला व कुलगुरूंना पाठवण्याची जबाबदारी मी घेतो. डॉ. डी. आर. मोरे म्हणाले, दर पाच-दहा वर्षांनी कोणीही उठतोय आणि विद्यापीठाचा नामविस्तार करा, अशी मागणी करतोय. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा इतिहास घराघरात पोहचवला पाहिजे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहिले पाहिजे, असा ठराव मांडणार आहे. एकमेव शिवाजी विद्यापीठात सर्व संघटना डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करतात. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन जोडून घेतले पाहिजे. त्यांच्यापर्यंत विद्यापीठाचा इतिहास गेला पाहिजे. वसंतराव मुळीक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. श्वेता परूळेकर यांनी एकलाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहिम राबवणार असल्याचे सांगितले. डॉ. अनिल माने यांनी बुध्दीभेदाला बळी पडू नये, असे आवाहन केले.
यावेळी दौलत देसाई, आनंद खामकर, राम तुपे, आर. के. पवार, महादेवराव आडगुळे, सरलाताई पाटील, शौमिका महाडिक, दिलीप पवार, डॉ. व्ही. एम. पाटील, उत्तम पाटील, विनोद पंडीत, सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांचा निषेध
शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी अधिवेशनात नामविस्ताराला पाठींबा दिला. सर्व पक्षीय संघटनेच्या बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा निषेध करण्यात आला. नामविस्ताराला पाठींबा देणाऱ्याच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
- शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहावे या मागणीसाठीचा कृती कार्यक्रम असा
-कोपरा सभा
-सिनेट सदस्य, पदवीधरांचे मेळावे
-विद्यार्थी, प्राध्यापकांना मार्गदर्शन
-राज्यपाल, सरकार आणि कुलगुरूंना निवेदन
-प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून विद्यापीठ इतिहासाबद्दल जनजागृती