राजस्थानातही निवडणूक लढविणार ‘आप’
मोठे राज्य असल्याने प्रचारमोहिमेचे आव्हान ः विनय मिश्रा
वृत्तसंस्था / जयपूर
गुजरातमध्ये स्वतःचे पाऊल ठेवल्यावर आम आदमी पक्ष आता राजस्थानातही सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. स्वतःचे पुढील लक्ष्य राजस्थान आणि हरियाणा असणार हे आता आम आदमी पक्षाने निश्चित केले आहे. यातही राजस्थानावत पक्ष जोरदारपणे प्रचार करताना दिसून येणार आहे. याकरता नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच तयारी सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यात आम आदमी पक्षाची पथके राज्यात दाखल होतील.
गुजरातमध्ये 5 जागा जिंकल्यावर आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर आम आदमी पक्षाचा उत्साह दुणावला आहे. अशा स्थितीत आप आता राजस्थानात हातपाय पसरू पाहत आहे. गुजरातच्या धर्तीवर पूर्ण तयारीनिशी आप राजस्थानातही निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातही आम आदमी पक्ष स्वतःचा प्रभाव दाखवून देऊ पाहत आहे.
संदीप पाठकांकडे जबाबदारी
गुजरातच्या धर्तीवर राजस्थानातही पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी तसेच आपचे राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पाठक हे राजस्थानात प्रचारमोहिमेची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रदेश प्रभारी विनय मिश्रा यापूर्वीच राजस्थानात सक्रीय झाले आहेत. जानेवारीपासून पक्ष राजस्थानात सक्रीयपणे स्वतःचे काम सुरू करणार आहे. प्राथमिक स्वरुपात सर्वेक्षणे पार पडली आहेत. त्याचबरोबर जानेवारीपासून पुढील सर्वेक्षण सुरू होणार आहे. तसेच पक्ष सदस्यत्व मोहिमेला वेग दिला जाणार आहे. राजस्थानताही दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर आम आदमी पक्ष निवडणूक लढविणार आहे. येथेही कथित विकासाचे मॉडेल पक्ष जनतेसमोर मांडणार आहे.
चेहऱयाचा शोध
राजस्थानात आम आदमी पक्ष सक्षम चेहऱयांचा शोध घेत आहे. अशा स्थितीत जानेवारीपासून पक्ष यादृष्टीने पावले उचलणार आहे. राजस्थानात दोन्ही पक्षांशी निगडित काही युवा नेत्यांशी ‘आप’ संपर्कात आहे. तसेच नव्या चेहऱयांनाही जोडण्याची तयारी असल्याचे समजते. राजस्थानावरून आम्ही केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अत्यंत चांगले प्राप्त झाले आहेत. राजस्थानातील प्रचार मोहीम आमच्यासाठी आव्हानात्मक राहणार असल्याचे उद्गार पक्षाचे राज्य प्रभारी आणि दिल्लीतील आमदार विनय मिश्रा यांनी काढले आहेत.