आपचे खासदार संजय सिंग यांनी न्यायालयाकडे मागितली वेळ
सौ. सुलक्षणा सावंत यांची बदनामी प्रकरण
डिचोली : दिल्लीतील आपचे खासदार संजय सिंह यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या पत्नी सौ. सुलक्षणा सावंत यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सौ. सावंत यांनी डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय सिंग यांच्या वकिलांनी काल शुक्रवारी न्यायालयात सुनावणी दरम्यान लेखी उत्तर देण्यास वेळ मागितली. त्यामुळे सुनावणी 7 मार्चपर्यंत पुढे गेली आहे. सौ. सुलक्षणा सावंत यांचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी, पुढील सुनावणीपर्यंत संजय सिंग कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह भाष्य करणार नाही. अशा प्रकारची हमीही त्यांनी न्यायालयात दिली आहे. तसेच लेखी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली.
दरम्यान संजय सिंग यांचे वकील सुरेल तिळवे यांनी पत्रकारांशी बोलताना, संजय सिंग हे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहेत. त्यामुळे आम्ही उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतलेला असून त्याला न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. तसेच पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य करणार नाही, अशीही हमी न्यायालयात देण्यात आलेली आहे, असे सांगितले. सुलक्षणा सावंत यांच्या वतीने वरिष्ठ वकील सुनील मनोहर, प्रल्हाद परांजपे, संजय सरदेसाई, अथर्व मनोहर, यशवर्धन सांबरे ए ,एस ,कुंदे, व यश टेंबे यांनी कामकाज पाहिले.