पिस्तूलची गोळी लागून आप आमदाराचा मृत्यू
पंजाबमधील घटनेचा पोलिसांकडून तपास
वृत्तसंस्था/ लुधियाना
आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे पिस्तूलची गोळी लागून निधन झाले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराची माहिती मिळताच त्यांना लुधियानातील डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आतापर्यंतच्या तपासानुसार परवानाधारक पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळी त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपचे आमदार गुरप्रीत गोगी यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यापासूनच मध्यरात्री उशिरा गोगी यांचे समर्थक आणि जवळचे मित्र रुग्णालयात पोहोचले होते.