आप नेते विजय नायरला मिळाला जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी आप नेते विजय नायरला सोमवारी जामीन मंजूर केला आहे. विजय नायर याप्रकरणी सुमारे 23 महिन्यांपासून तुरुंगात होता. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी नायर यांना जामीन मिळाल्यावर सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपच्या केंद्र सरकारने आम आदमी पक्षाच्या विरोधात षडयंत्र रचले आणि पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबले, परंतु मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांना जामीन मिळाल्याने सत्य कधीच पराभूत होऊ शकत नसल्याचे सिद्ध झाल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.
माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनीही नायर यांना जामीन मिळणे म्हणजे सत्याचा विजय असल्याचा दावा केला आहे. भाजपने रचलेल्या अबकारी धोरण घोटाळ्याचा आणखी एक फुगा आज फुटला आहे. कुठलाही पुरावा नसताना विजय नायर यांना 23 महिन्यांपर्यंत तुरुंगात डांबण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या पूर्ण टीमला त्रास देणे हाच यामागील एकमेव उद्देश होता असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. विजय नायर हे आम आदमी पक्षाचे संचार प्रभारी राले आहेत. तसेच ते ओनली मच लाउडर या कंपनीचे माजी सीईओ आहेत.